मुंबई - येत्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत होणाऱ्या चित्ररथात महाराष्ट्रातील ‘साडेतीन शक्तिपीठे, स्त्रीशक्ती जागर याचे दर्शन घडवले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर चित्ररथाचे काम नवी दिल्लीत युद्धपातळीवर सुरू झाले आहे. कर्तव्यपथावर होणाऱ्या चित्ररथाकडे अवघ्या देशवासीयांचे लक्ष लागले आहे.
साडेतीन शक्तीपीठे - दरवर्षी प्रजासत्ताक दिनी देशभरातील राज्यातून चलचित्रे सादर केली जातात. त्यानुसार विविध राज्ये आणि मंत्रालये उत्तमोत्तम संकल्पना निवडतात. कलाकार त्या संकल्पनांना मूर्त रूप देतात. यंदा महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे, स्त्री शक्तीचा जागर सादर केला जाणार आहे. महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजा भवानीचे श्री. क्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी, वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा यात समावेश होतो. या देवींच्या भव्य, तितक्याच सुंदर प्रतिमांचे त्यांच्या माध्यमातून स्त्री सामर्थ्याचे दर्शन सर्व देशवासीयांना करण्याचे नियोजन राज्य शासनाने आखले आहे. शासनाच्या टीम यासाठी मेहनत घेत आहे.
तीस जणांच्या टीमचा कसब - राज्य शासनाच्या संकल्पना, रेखाचित्रे, त्रिमितीय प्रतिकृती तुषार प्रधान, रोशन इंगोले या युवा मूर्तिकार कलादिग्दर्शक यांनी तयार केली आहे. त्यांच्यासोबत शुभ एडचे संचालक नरेश चरडे, पंकज इंगळे हे भव्य प्रतिकृतीचे काम करत आहेत. तसेच ३० जणांच्या चमूचा यात समावेश असून राहुल धनसरे महाराष्ट्राचा चित्ररथ पूर्ण करण्याचे काम करीत आहेत. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे सहकारी यांच्या सहकार्याने हा चित्ररथ पूर्णत्वास येणार आहे.
गेल्यावर्षी जैवविविधतेचे दर्शन - देशाचा ७३ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर देशातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी होतात. महाराष्ट्राने चित्ररथ सादर करताना, जैवविविधतेचे दर्शन घडवले होते. महाराष्ट्राचा राज्य प्राणी 'शेकरू' 'ब्ल्यू मॉरमॉन' फुलपाखरू, मोर तसेच विवीध अभयारण्यातील दुर्मिळ होत असलेल्या वनस्पती, प्राण्यांच्या प्रजाती, अशी जैवविविधता दाखवणारा चित्ररथ दाखवण्यात आला होता. या चित्ररथाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देखील दिला होता.