मुंबई - पारनेरच्या शिवसेना नगरसेवकांचा विषय आता संपला आहे. काही दिवसांपूर्वी पारनेरचे आमदार निलेश लंके बारामतीला काही लोक गाड्यांमधून घेऊन आले होते. काही अपक्ष नगरसेवक राष्ट्रवादीत येत आहेत, असे लंकेनी सांगितले. त्यामुळे घाईघाईत मीच पक्षाचे गमचे टाकून त्यांचा प्रवेश करून घेतला. त्यांनतर मुख्यमंत्री नाराज असल्याच्या अनेक बातम्या आल्या मात्र, मुख्यमंत्री नाराज आहेत हे प्रसारमाध्यमांनी रंगवलेले चित्र होते, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
मी नंतर विचारलं तेव्हा लंकेने सांगितले, की हे शिवसेनेचे आमदार आहेत. ते भाजपमध्ये जात आहेत म्हणून आपल्याकडे घेतले. महाविकासआघाडीचे सरकार मजबूत आहे. तीन पक्षांमध्ये समन्वय आहे. एकमेकांचे पदाधिकारी फोडू नये. मी सर्वांना समजून सांगितले असल्याचेही पवारांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याप्रकरणी नाराज होते का? या प्रश्नावर अजित पवार यांनी नकारार्थी उत्तर दिले. मुख्यमंत्री नाराज असण्याचा काहीच प्रश्न नाही. तेव्हा त्यांनी कधीही माझ्याजवळ नाराजी व्यक्त केली नाही. मुख्यमंत्र्यांची नाराजी हे प्रसारमाध्यमांनी चित्र रंगवलेले चित्र होते. महाविकासआघाडीचे सरकार मजबूत आहे. एकमेकांमध्ये समन्वयदेखील आहे. एकमेकांचे पदाधिकारी फोडायचे नाही हे तत्व आहे. गैरसमजातून झालेली चूक सुधारली आहे. पारनेर शिवसेना नगरसेवक पुन्हा स्वगृही गेले आहेत. हा वाद आणि विषय आता संपवावा, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.