मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या (दि. 17 नोव्हेंबर) स्मृतिदिन आहे. याप्रसंगी हजारो शिवसैनिक शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करण्यासाठी येतात. मात्र, यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शिवाजी पार्क येथे न येता घरातून, कार्यालयातून असाल तेथून बाळासाहेबांना अभिवादन करावे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
कोरोनामुळे आवाहन
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरू केले जात आहेत. यादरम्यान गर्दी करू नका, गर्दीत जाऊ नका, असे आवाहन राज्य सरकारकडून केले जात आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या सणांमुळे काही प्रमाणात रुग्ण वाढले होते. आता रुग्णांची संख्या काही प्रमाणात आटोक्यात आहे. त्याच दरम्यान दिवाळी, पाडवा, भाऊबीज हे सण साजरे केले जात आहेत. हे सण साजरे करताना सुरक्षेचा उपाय म्हणून नागरिकांनी घरात राहून सण साजरे करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
असाल तेथून करा अभिवादन
17 नोव्हेंबर 2012 ला बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. त्यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याठिकाणी शक्तीस्थळ निर्माण करण्यात आले आहे. या ठिकाणी दरवर्षी शिवसैनिक बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त घरातून, कार्यालयातून असाल तेथून शिवसैनिकांनी व इतर नागरिकांनी अभिवादन करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. शिस्त आणि शिस्तीचे पालन करा हेच बाळासाहेबांना खरे अभिवादन आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आठवा स्मृतिदिन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आठवा स्मृतिदिन आज आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जरी स्मृतीस्थळी न येता घरातून किंवा आहे त्या ठिकाणाहून अभिवादन करण्याचे आवाहन केले असले तरी अनेक जण स्मृती स्थळावर जातील असा आंदाज व्यक्त केला जात आहे.