मुंबई - वीर वि. दा. सावरकर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने राज्य शासनामार्फत २८ मे ला ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. वीर सावरकर यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी राज्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याचे ते म्हणाले. त्यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.
सावरकरांनी महत्त्वाची भूमिका - महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींत वीर सावरकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. देशाचे स्वातंत्र्य तसेच देशाच्या प्रगतीसाठी सावरकर यांचे अत्यंत महत्वाचे आणि मोठे योगदान आहे. वीर सावरकर यांनी अस्पृश्यता निर्मूलन, सामाजिक सुधारणांचा नेहमीच त्यांच्या लेखनातून पुरस्कार केल्याचे दिसून येते. आदर्श महापुरूष म्हणून त्यांची आजही ख्याती आहे. त्यांच्या अतुलनीय योगदानाला आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि तरुण पिढीला त्यांच्या देशभक्ती, धैर्य आणि प्रगतीशील विचारांना पुढे नेण्यासाठी वीर सावरकरांचा जन्मदिवस साजरा करायला हवा, अशी मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीची दखल घेतली. त्यांनी वीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी गौरव दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित केले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
शिंदे गटाकडून सावरकरांची गौरव यात्रा - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकरांवर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यात सध्या वातावरण तापले आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून सावरकरांची गौरव यात्रा काढली जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील सावरकरांच्या विचाराची पाठराखण केली आहे. तर, गेली नऊ वर्षे केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना भारतरत्न का दिला जात नाही, असा प्रश्न देखील विरोधी पक्षांनी विचारला आहे. देशातील महागाई, बेरोजगारी, गरीबीचे प्रश्न डावलण्यासाठी सावरकरांचा मुद्दा चव्हाट्यावर आणला जात असल्याचा आरोप सुरू आहे.