मुंबई - दोन दिवसांपूर्वी राजभवन येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकत्र घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज यांनी मंत्रालयात येऊन आपला पदभार स्वीकारला. मात्र, सोबत शपथ घेतलेले अजित पवारांनी अद्याप मंत्रालयात येऊन आपला पदभार स्वीकारलेला नाहीत. ते थोड्याच वेळात येतील, असे सांगितले जात आहे.
फडणवीस यांनी शपथ घेण्यापूर्वी विधानभवन परिसरात असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ दिलीप वळसे-पाटील आदी उपस्थित होते. तर, मुख्यमंत्री यांच्यासोबत खासदार रावसाहेब दानवे, खासदार प्रतापराव चिखलीकर, आमदार राहुल कुल आदी नेते उपस्थित होते.
फडणवीस यांनी अकरा वाजता चव्हाण यांच्या प्रतिमेला अभिवादन करून थेट मंत्रालय गाठले. सुरुवातीला त्यांनी मंत्रालयात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर एनएक्स इमारतीत असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला अभिवादन करून ते सहाव्या मजल्यावर पोहोचले. त्यानंतर त्यांनी आपला पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या धनादेशावर सही करून तो एका महिलेला दिला. कोणत्याही प्रकारचे विधान न करता मुख्यमंत्री थोडावेळ थांबून पुढे निघून गेले.