मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानकारक विधान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरोधात (Governor Bhagatsinh koshyari) छात्र भारतीने 'कुलपती गो बॅक' (Chancellor Go Back) आंदोलन केले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि अन्य नेत्यांच्या आक्षेपार्ह विधानांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
कुलपती गो बॅक : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वारंवार आक्षेपार्ह विधानं केली जात आहेत. याबद्दल महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत. या संतापाला जागा करून देण्यासाठी छात्र भारतीच्या वतीने आज क्रांतीसूर्य महात्मा फुले स्मृतिदिनी मुंबई विद्यापीठ परिसरात सविनय मार्गाने निदर्शने करण्यात आली. यावेळी, ...अपमान झाला छत्रपतींचा, विसरून जाऊ सन्मान आम्ही कुलपतींचा...शिवराय केवढे? आभाळा एवढे अशा घाषणांनी विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला.
आज विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत. उद्या कामगार रस्त्यावर येतील. निषेध करतील. राज्यभर सगळ्या विद्यापीठ, कॉलेजमध्ये या विधानांचा निषेध केला जाईल. राज्यपाल भवनावरही मोठा मोर्चा काढू. राज्यपालांना हटवल्याशिवाय आता महाराष्ट्र गप्प बसणार नाही.' अशा शब्दात छात्र भारतीचे राज्य अध्यक्ष रोहित ढाले यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. या निदर्शनाला मुंबई मधील विद्यार्थी ,शिक्षक संघटना सामील झाल्या होत्या.