मुंबई - मुंबईमध्ये 5 दिवसांपासून संततधार पावसामुळे जागोजागी भिंत कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. मुसळधार पावसाचा फटका कांजूर परिसरातील परांजपे हॉलसमोरील फ्रेंड्स सर्कलच्या चाळीलाही बसला आहे. चंद्रप्रभा इमारतीची संरक्षक भिंत चाळीमधील घरांवर कोसळल्यामुळे या ठिकाणच्या घरांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी मध्यरात्री 12 च्या दरम्यान पावसामुळे चंद्रप्रभा इमारतीची संरक्षक भिंत बैठ्याचाळीमधील हिंदुराव पार्टे, अविनाश कदम, दाकू कुंभार, बाळकृष्ण कांबळे यांच्या घरावर कोसळली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नसून घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या ठिकाणी चंद्रप्रभा इमारतीची भिंत कोसळ्यामुळे घरातील लोकांना घराबाहेर पडता येत नव्हते. त्यामुळे नागरिकांना रात्रभर भर पावसात घरातच राहावे लागले. यावेळी घरामध्ये पावसाच्या पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात येत होता. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते.
नागरिकांनी आरडा ओरड केल्यानंतर स्थानिकांनी घरातील रहिवाशांना खिडकीतून बाहेर काढले. त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे. या इमारतीची भिंत पाया न भरता बनवल्यामुळे ही घटना घडली घडल्याचे नगरसेवक दादा पिसाळ यांनी सांगितले. तसेच त्यांनी या घटनेसाठी प्रशासनाला जबाबदार धरले आहे.यामध्ये ज्या घरांचे नुकसान झाले आहे. ते चंद्रप्रभा इमारत सोसायटी रहिवाशांना देणार असल्याचे सोसायटीने सांगितले.