मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या लोकल प्रवासावर निर्बंध आणले होते. मात्र, आता टाळेबंदीमध्ये शिथिलता मिळाल्याने जवळजवळ सर्वच व्यवहार खुले झाले असून मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत आहेत. मात्र, सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकलचे दार बंद असल्याने बनावट ओळखपत्राच्या आधारावर सर्वसामान्य प्रवासी लोकल प्रवास करताना दिसून येत आहे. मध्य रेल्वेच्या एप्रिल ते १८ सप्टेंबर दरम्यान केलेल्या कारवाईत चार हजार ८९१ बनावट ओळखपत्र जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.
बनावट ओळखपत्र जप्त २४ लाख ४७ हजार रुपयांचा दंड वसूल, मास्क नसलेल्यांकडून ४ लाख २९ हजार २४५ रुपयांचा दंड आकारला
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकलचे दार बंद केले होते. फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासात मुभा दिली आहे. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे टाळेबंदीच्या नियमात शिथिलता देण्यात आली आहे. यामुळे लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्यांना लोकल प्रवासात मुभा नसली तरी अनधिकृतपणे प्रचंड प्रमाणात नागरिक लोकलने प्रवास करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेकजण बनावट ओळखपत्र तयार करून लोकल प्रवास करत असल्याचे प्रकार समोर आले आहे. मध्य रेल्वेच्या एप्रिल ते १८ सप्टेंबर दरम्यान केलेल्या कारवाईत चार हजार ८९१ बनावट ओळखपत्र जप्त करुन त्या प्रवाशांकडून २४ लाख ४७ हजार २३५ रुपयांचा दंड वसूल केला आहे. याशिवाय प्रवासादरम्यान मास्क नसलेल्या दाेन हजार १९३ प्रवाशांना चार लाख २९ हजार २४५ रुपयांचा दंड आकारला आहे.
प्रवासी हतबल
सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि काेराेना प्रतिबंधक लसीच्या दाेन्ही मात्रा घेतलेल्या प्रवाशांना लाेकल प्रवासाची मुभा आहे. लसीच्या दाेन्ही मात्रा घेतलेल्या प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. पण, आजही लसीच्या दाेन्ही मात्रा न घेतलेले किंवा एकच मात्रा घेतलेल्यांची संख्या माेठी आहे. रस्ते मार्गाने प्रवास करणे अधिक खर्चिक आणि वेळखाऊ असल्याने हतबल झालेले प्रवासी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे बनावट ओळखपत्रांवर प्रवास करण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रवाशांवर रेल्वेतर्फे कारवाई करण्यात येते.
हेही वाचा - रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी : वसई ते पनवेल मेमू सेवा शुक्रवारपासून होणार सुरु