मुंबई - जगासह देशभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ मार्चपर्यंत रेल्वेची सर्वप्रकारची प्रवासी वाहतूक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला. आज मध्यरात्रीपासून सर्व प्रकारची रेल्वे प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
राज्य सरकारला विश्वासात घेऊनच हा निर्णय घेतला असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ई टीव्ही भारत सोबत बोलताना सांगितले. रेल्वेवरील प्रवासी वाहतूक वगळता मालवाहतूक सुरू राहणार आहे. या मालगाड्यांसाठी मोटरमन यांना इच्छितस्थळी नेण्यासाठी काही खासगी बसची व्यवस्था करण्यात आल्याचेही सुतार यांनी सांगितले.