मुंबई: सन १८५३ पासून आजपर्यंत, जसजशी वर्षे निघून गेली, तसतशी पहिली ट्रेन चालवणारी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे १९०० मध्ये इंडियन मिडलँड रेल्वे कंपनीत विलीन झाली . उत्तरेकडे दिल्ली, ईशान्येला कानपूर आणि अलाहाबाद तसेच पूर्वेला नागपूरपासून व दक्षिण-पूर्वेला रायचूरपर्यंत त्याच्या सीमांचा विस्तार केला. निजाम, सिंधिया आणि ढोलपूर ही राज्य एकत्र करून ५ नोव्हेंबर १९५१ रोजी मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली. सध्या मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे या ५ विभागांसह मध्य रेल्वेचे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये ४,२१९ मार्ग किलोमीटरपेक्षा जास्त नेटवर्क आहे. मध्य रेल्वे या राज्यांना ४७१ स्टेशन्सद्वारे सेवा देते. निर्मितीच्या वेळचे मूळ लोडिंग १६.५८ दशलक्ष टन होते. ते आता २०२२-२३ मध्ये ८१.८८ दशलक्ष टन झाले आहे. जे आतापर्यंतचे सर्वांत अधिक आहे.
या गाड्या पहिल्यांदा धावल्या: एप्रिल १८५३ मधील पहिल्या ट्रेनपासून ते भारतातील सर्वांत आधुनिक ट्रेनपर्यंत, गेल्या १७० वर्षांमध्ये रेल्वेने आपले नेटवर्क मोठ्या क्षेत्रापर्यंत वाढवले आहे. ती १०० वर्षांनंतरही प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहेत. १० फेब्रुवारी २०२३ रोजी, वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून हिरवा झेंडा दाखवला, जेथून आशियातील पहिली ट्रेन निघाली होती. हा वारसा आणि विकासाचा परिपूर्ण संगम आहे. शताब्दी एक्सप्रेस, जन शताब्दी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस या मध्य रेल्वेवर सर्वांत आधी धावल्या आहेत.
३ डब्बे ते एसी गाडी : ३ फेब्रुवारी १९२५ रोजी तत्कालीन बॉम्बे व्हीटी म्हणजे आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कुर्ला हार्बर दरम्यान भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन सेवा चालवून रेल्वेचे विद्युतीकरण केले. मध्य रेल्वेने १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण केले आहे. उपनगरीय नेटवर्क देखील सातत्याने वाढले आहे. सध्या मध्य रेल्वेकडे पाच उपनगरीय कॉरिडॉर आहेत. तीन डब्यांपासून सुरू झालेली उपनगरीय सेवा हळूहळू ९, १२ आणि १५ डब्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. आरामदायी आणि सोयीस्कर प्रवासासाठी उपनगरीय सेवा सुरू करण्यात आली आहे.
नेरळ-माथेरान मार्गाला ११६ वर्षे पूर्ण : नेरळ ते माथेरान रेल्वेचे बांधकाम १९०४ मध्ये सुरू झाले आणि दोन फूट गेज लाईनचा मार्ग १९०७ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पावसाळ्यात हा रेल्वेमार्ग बंद असायचा. अमन लॉज आणि माथेरान दरम्यान शटल सेवा २९ सप्टेंबर २०२२ पासून पावसाळ्यातही चालण्यासाठी सुरू करण्यात आली. २२ ऑक्टोबर २०२२ पासून नेरळ माथेरान एनजी लाईनवरील दोन सेवा पुन्हा सुरू झाल्या. या ट्रेनमध्ये २०२३ पासून वातानुकूलित सलून सेवा देखील सुरू केल्या आहेत. (Press Note)