मुंबई - दृष्टीहीन प्रवाशांच्या सुविधेसाठी भारतीय रेल्वेकडून अनेक उपायोजना करण्यात येत आहे. त्यातील एक भाग म्हणजे मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर दृष्टीहीन प्रवाशांचे परावलंबित्व कमी करण्यासाठी ब्रेल लिपीची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे दृष्टहीन प्रवाशांना मोठा दिलास मिळणार आहे.
फलाटांची माहिती दिल्याने स्थान शोधण्यास होणार मदत
मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सीएसआर अंतर्गत अंध प्रवाशांसाठी ब्रेल लिपीची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. जिना, लिफ्ट, पादचारी पूल, विश्राम गृह, महत्वाची कार्यालये, बसण्याची आसने, पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी, स्थानकाचा नकाशा, फलाटांची माहिती ब्रेल लिपीत देण्यात आली आहेत. त्यामुळे दृष्टीहीन प्रवाशांना इच्छित स्थान शोधण्यासाठी याची मदत होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.
नेत्रहीन प्रवाशांसाठी ब्रेल चिन्हे
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने प्रवाशांसाठी, विशेषत: दृष्टिहीन व्यक्तींसाठी सेवा देण्यास नेहमीच प्रयत्न केले आहेत. त्याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचा ब्रेल नकाशा, स्टार चेंबर बुकिंग कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बसवण्यात आला आहे. यामध्ये फलाट, कार्यालये, प्रसाधनगृहे, प्रवेश, बाहेर पडण्याचे मार्ग, प्रतीक्षालय आदी ठिकाणांना ब्रेल चिन्हानी दर्शवण्यात आहे.
स्थान शोधण्यास होणार मदत
या ब्रेल लिपीमुळे दृष्टिबाधित प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील विविध सुविधांची माहिती आणि स्थान शोधण्यात मदत होईल. या ब्रेल लिपिसाठी यात्रा ऑनलाइन प्रायव्हेट लिमिटेडची कॉर्पोरेट बिझनेस शाखा यात्रा फार बिझिनेस आणि अनूप्रयास यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
हेही वाचा - मुंबईतील रखडलेले रेल्वे प्रकल्प लागणार मार्गी; केंद्रीय अर्थसंकल्पात एमयूटीपी प्रकल्पासाठी 650 कोटींची तरतूद