मुंबई : राज्य सरकारने अनलॉक 4 मध्ये ई-पास रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. यानंतर, मध्य रेल्वेने आज(मंगळवार) राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला पत्र लिहून आंतरजिल्हा रेल्वे वाहतूक सुरू करत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे गेले 5 महिने बंद असलेली आंतरजिल्हा वाहतूक उद्यापासून सुरू होणार आहे.
राज्यात अनलॉक-४ ची घोषणा झाली आहे. अनलॉक-४ टप्प्यात राज्यातील आंतरजिल्हा प्रवासासाठीची ई-पास सक्ती रद्द करण्यात आली. त्यांनतर आता मध्य रेल्वेनेही राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु करण्याला परवानगी दिली आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य व्यवस्थापन विभागाने राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव किशोर निंबाळकर यांना पत्र पाठवले. यात 2 सप्टेंबरपासून आंतरजिल्हा रेल्वे वाहतुकीला परवानगी देत आहोत, राज्यांतर्गत रेल्वे बुकिंग 2 सप्टेंबर सुरू होत असल्याचे लिहिले आहे. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर राज्यांतर्गत प्रवासासाठी 2 सप्टेंबरपासून तिकीट बुकींग करता येणार आहे, असंही रेल्वेनं म्हटलं आहे. ई-पास रद्द झाल्यामुळे आंतरजिल्हा रेल्वे वाहतूक सुरू होत असल्याने राज्यातील नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी दिलासा मिळाला आहे.
लॉकडाऊन काळात श्रमिक स्पेशल रेल्वे परराज्यात जाण्यासाठी चालवण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आंतरजिल्हा वाहतूकीवर राज्य शासनाकडून कडक निर्बंध लावले होते. मात्र, आता ई-पासची अट रद्द झाल्याने व आंतर जिल्हा रेल्वे वाहतूक सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने राज्यातील नागरिकांला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, याबाबत मध्य रेल्वे किंवा राज्य सरकारकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
हेही वाचा - कर्ज वसुलीच्या गैर प्रकारामध्ये लक्ष घालावं; आमदार रोहित पवारांची गृहमंत्र्यांकडे मागणी