मुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी चौकशी करणाऱ्या सीबीआयच्या पथकाकडून सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी याला पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. शनिवारी सीबीआयच्या पथकाने सुशांतच्या वांद्रेस्थित घरी सिद्धार्थला नेऊन 13 जून व 14 जून रोजी घडलेल्या घडामोडींचे 'रिक्रिएशन' केले. सिद्धार्थने दिलेला जबाब व घटनास्थळी करण्यात आलेल्या रिक्रिएशनमधून बांधण्यात आलेल्या अंदाजवर आता सीबीआय तपास करत आहे.
13 जून व 14 जून रोजी सिद्धार्थ पिठाणी हा सुशांतच्या सोबत संपूर्ण वेळ होता. 14 जून रोजी सुशांतच्या खोलीचा दरवाजा उघडत नसल्याचे लक्षात येताच सिद्धार्थनेच याबद्दल सुशांतची बहीण मितू सिंहला कळवले होते. सुशांतच्या बेडरूमचा दरवाजा उघडण्यासाठी सिद्धार्थ पिठाणी याने चावी बनवणाऱ्या व्यक्तीला बोलवून दरवाजा उघडण्यासाठी दोन हजार रुपये दिले होते. दरवाजा उघडताच चावी बनवणाऱ्या व्यक्तीला घरातून तत्काळ निघून जाण्यास सांगण्यात आले होते.
सुशांतच्या घरी आठवड्यातून दोन वेळा पार्टी केली जात असे. प्रत्येक पार्टीला सिद्धार्थ पिठाणी हा हजर असे. या पार्ट्यांमध्ये सिद्धार्थ पिठाणी याने काही वेळा सुशांतला गांजा ओढण्यासाठी रोल बनवून दिले होते, अशी माहिती सुशांतचा स्वयंपाकी नीरज सिंह याने त्याच्या जबाबात म्हटले आहे.