मुंबई - गेली ५० वर्षे व्यगंचित्रकलेची सेवा करणारे व राजकीय व्यंग अचूकपणे हेरून कुंचल्याचे चौफेर फटकारे मारणारे ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे शुक्रवारी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज शनिवारी दादर हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंत्यदर्शन घेतले. तसेच त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.
विकास सबनीस गेला आठवडाभर रुग्णालयात उपचार घेत होते. अधिक तपासणीसाठी त्यांना माहीम येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दादर हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सबनीस यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री आशिष शेलार, माजी महापौर महादेव देवळे आदी मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. सबनीस यांच्या इच्छेनुसार कोणतेही धार्मिक विधी न करता अंत्यसंस्कार करण्यात आले.
बाळासाहेब ठाकरे अन् आर. के. लक्ष्मण यांचे व्यंगचित्र पाहून झाले होते प्रभावित -
सबनीस यांच्या व्यंगचित्र कारकिर्दीला यंदाच ५० वर्षे पूर्ण झाली होती. त्यानिमित्त २० फेब्रुवारीला शिवाजी पार्क येथील सावरकर सभागृहात आयोजित 'रेषा विकासची, भाषा ५० वर्षांची' या विशेष कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला होता. त्यांनी १९६८ पासून व्यंगचित्रकलेची साधना केली. टाइम्स ऑफ इंडियामध्ये आर. के. लक्ष्मण यांची आणि मार्मिकमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे पाहून ते प्रभावित झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांमागचा राजकीय विचार आणि त्यामागील विचारशक्ती पाहून आकर्षित झाल्याने त्यांनी राजकीय व्यंगचित्रकार होण्याचा निर्णय घेतला होता.