मुंबई : मेडिकल स्टोअर चालविण्यासाठी फार्मसीसंबंधी परवाना आवश्यक आहे. मात्र, अनेकदा मेडिकल स्टोअरमध्ये फोटोसह लावलेल्या परवान्याची प्रत असते एकाच्या नावावर, तर मेडिकल चालवणारी व्यक्ती दुसरीच असल्याचा अनुभव कित्येकदा पहायला मिळतो. म्हणजेच काय तर प्रत्यक्षात फार्मसीचा परवाना दुसऱ्याचा अन् मेडिकल चालविणारा दुसराच व्यक्ती असतो. असे भयंकर प्रकार मुंबईत घडत असून अशा 78 मेडिकल स्टोअर्सचे परवाने अन्न, औषध प्रशासनाने (एफडीए) रद्द केले आहेत. मुंबईतील जवळपास 1हजार 195 मेडिकल स्टोअर्सची झाडाझडती एफडीएने घेतली आहे. या कारवाईत परवान्यासंबंधी अनियमितता आढळली असून या कारवाईमुळे मेडिकल स्टोअर चालवणाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे.
365 मेडिकलचे परवाने निलंबित : हल्ली सर्रास प्रेस्क्रीप्शन शिवाय मेडिकलमध्ये औषधे दिली जातात. त्याचप्रमाणे फार्मसीचे परवाने म्हणजेच लायसन्स कोणा वेगळ्याच नावावर असते. तर मेडिकल कोणी दुसरे चालवत असतात असे अन्न, औषध प्रशासनास आढळून आले. त्यानंतर अन्न, औषध प्रशासनाने पाठवायचा फास आवळ्याला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांपैकी प्रशासनाने 78 मेडिकल दुकानांचा परवाना रद्द केला असून 36 दुकानांना सस्पेशन नोटीस बजावली आहे, तर 365 मेडिकलचे परवाने निलंबित केले आहेत.
परवाना रद्द करण्याचे कारण काय? : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रिप्शन) रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना औषध देणे, दुकानात फार्मासिस्ट नसणे, खरेदी- विक्रीच्या योग्य नोंदणी नसणे, आवश्यक औषधे फ्रीजमध्ये न ठेवणे अशा अनेक नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होते. मुंबई शहरात 7 हजार 758 किरकोळ मेडिकल दुकाने असून, 5 हजार 558 होलसेलर मेडिकल दुकाने आहेत. वर्षभरात एफडीएने 1 हजार 195 मेडिकलची तपासणी केली आहे. मेडिकल दुकानांची वर्षभरात अन्न,औषध प्रशासन विभागाने तपासणी केली. औषधी दुकान चालवताना नियम ६५ नुसार दुकानदाराने कोणती काळजी घेतली पाहिजे, हे नमूद केले आहे. त्या नियमातील अटी, शर्तीचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाते, अशी माहिती अन्न, औषध प्रशासनच्या अधिकाऱ्याने दिली आहे.