मुंबई : देशातील लोकसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुकीपूर्वीच सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यात शाब्दिक द्वंद रंगताना दिसत आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवरून सत्ताधाऱ्यांना फैलावर धरले आहे. इकडे विरोधीपक्ष नेतेपदाची सूत्र हाती घेताच विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील शिंदे सरकार आणि केंद्रातल्या भाजप सरकारवर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा पक्षांतर्गत काटा काढून त्यांचे राजकारण संपवण्यासाठीच कॅगचा अहवाल असल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
काय म्हणाले वडेट्टीवार - विजय वडेट्टीवार यांनी आज (शुक्रवारी) वाय बी सेंटर येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी कॅगच्या अहवालावर आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, कॅगचा अहवाल आला असून मोदी सरकारच्या काळातील सात रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. काँग्रेस सरकार जेव्हा केंद्रात होते त्यावेळेस आम्हाला बदनाम केले गेले. आता अहवालानुसार दोन गोष्टी समोर येतात. एक तर गडकरींचा काटा काढायचा आहे, ही त्या मागची भूमिका असू शकते. प्रत्येक विभागांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार असताना कॅगने फक्त त्यांच्यावर ताशेरे ओढले, त्यातून अशी भूमिका आम्हाला दिसते.
गडकरींचे राजकारण संपवायचे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची प्रतिमा स्वच्छ आणि विकासाची आहे. त्यातून त्यांना बाजूला सारायचं आणि त्यांचं राजकारण संपवायचं, असा एक दृष्टिकोन असू शकतो असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच दुसरी भूमिका अशी देखील मला मांडायची आहे की, रस्ते व महामार्ग समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. मग त्यांची भूमिका काय अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित होत असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले आहे. केंद्रात सगळीकडे भ्रष्टाचार सुरू आहे. कॅगच्या अहवालानंतर केंद्र सरकार काय कारवाई करते, याकडे आमचे सर्वांचे लक्ष असल्याचेही ते म्हणाले.
भाजपलाच मत : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनी लोकांचा राग मतपेटीतून बाहेर येत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचे नुकसान कोणी थांबवू शकत नाही, असे म्हटले होते. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी उलट सवाल करत मतपेटी सुरक्षित आहेत काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे. काल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की, मतदान करण्यासाठी जाल तेव्हा मत भाजपलाच मिळेल. लोकांना काहीही मिळाले नसताना हा आत्मविश्वास येतो कुठून, असा प्रश्न देखील वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
हेही वाचा: