मुंबई - तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेली जलयुक्त शिवार योजना आता महालेखापाल यांच्या कचाट्यात सापडली आहे. जलयुक्त शिवार योजना असफल झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील गाव दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट असफल झाल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे.
पाण्याची साठवण निर्मिती कमी असतानाही गावे जलपरिपूर्ण म्हणून घोषित केल्याचे कॅगच्या अहवालात समोर आले आहे. जलयुक्त शिवार योजनेचे मुख्य उद्दिष्ट भूजल पातळीत वाढ करणे होते. पण, अनेक गावामध्ये वाढ होण्याऐवजी भूजल पातळी कमी झाल्याचे निदर्शनास आले. या योजनेअंतर्गत केलेल्या कामाचे छायाचित्र (फोटोग्राफ) वेबसाईटवर अपलोड केले गेले नव्हते. तर अनेक कामांचे त्रयस्थ संस्थेकडून मूल्यमापन झाले नाही, असेही कॅगने अहवालात म्हटले आहे.
यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही योजना दहा वर्षासाठी होती. मात्र, या सरकारने अवघ्या चार वर्षांतच जलयुक्त शिवार ही योजना बंद पाडली, असा आरोपही त्यांनी केला.