मुंबई - रस्त्यांवर, गल्लोगल्ली, वस्त्यांत डोक्यावर किंवा सायकलवर मोठं भांड घेवून, इडली, मेदू वडा, डोसा विकणारे अण्णा-अक्का सर्वांनाच परिचित आहे. एक विशिष्ट भोंग्याचा आवाज झाला म्हणजे ईडली, मेदूवडा आला हे सर्वांना कळून जात. मात्र, आता लॉकडाऊनने या भोंग्याची हवा काढून घेतली. रोज हजार ते पंधराशे रुपये कमावणारे अण्णा-अक्का आता कसेबसे एक वेळेचे जेवण करुन दिवस काढत आहेत. धारावी आणि ईडली, मेदूवडा, डोसावाला अण्णा-अक्का यांचं एक वेगळ समीकरण आहे. त्यावर आधारित वाचा ई टीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट...
![सकाळी-सकाळी कामासाठी लवकर बाहेर पडलेले विद्यार्थी आणि नोकरदार इडली-वडे वाल्यांकडे नाश्ता करताना](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/_22052020033546_2205f_1590098746_290.jpeg)
हातावर पोट असणाऱ्या कामगारांच्या धारावीत कोरोनाने थैमान घातले असून अनेकांचे मृत्यूही झालेत. सर्वत्र कोरोनाची भीती असल्यामुळे चालणारे कामधंदे बंद आहेत. सर्वांची आर्थिक गणितं बिघडली आहेत. सध्या कोरोनामुळे गल्ल्या शांत झाल्याने नेहमी सकाळ संध्याकाळ ऐकू येणारा पो-पो’ वाजणारा भोंगा ही थंडावला आहे.
चकाकणारे अॅल्यूमिनियमचे मोठे पातेले, आणखी एखादं भांडं, डबा, पिशवी हे सगळ डोक्यावर, सायकलवर घेऊन रोज मुंबईतील लोकांची भूक भागवणारा ईडली, मेदूवडा, डोसावाला या लॉकडाउनमध्ये दिसेनासा झाला आहे. ईडलीवाल्यांवर कोरोनामुळे मोठं आर्थिक संकट कोसळले आहे.
मुंबईतील इडलीवाले मुळात दक्षिणात्य तरीही भाषा-जाती-धर्माच्या पार जाऊन सर्व खवय्यांना तृप्त करणारा नाश्ता हे इडलीवाले देतात. इ़डली-वडा-डोसा हा कामासाठी लवकर बाहेर पडणाऱ्यांच्या नाश्त्याचा आणि पर्यायाने मुंबईच्या समकालीन खाद्यसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. माटुंग्याच्या साउथ इंडियन पट्ट्यात अस्सल दक्षिणात्य इडली-डोसा खाऊ घालणारी अनेक उपहारगृहे आहेत. तरी रस्त्यावरच्या या भोंगा वाजवत येणाऱ्या इडलीवाल्यांच्या आश्रयाला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, सध्या जगावर आलेल्या कोरोना संकटामुळे त्यांच्या देखील पोटावर पाय आले आहेत.
मुंबईतील धारावीत राहणारे सुरेश नाडार हे मागील 40 वर्षांपासून गल्लोगल्ली फिरून इडली-मेदुवडा-डोसा विकण्याचे काम करतात. त्यांच्या आजोबांपासून त्यांचे कुटुंब हाच व्यवसायावर करत आहे. धारावीत त्यांचे वडील रमेश नाडार हे दक्षिण तिरुपंचम येथून 80 वर्षांपूर्वी धारावीत आले आले होते. आपले दक्षिणात्य पदार्थ बनवून विकत त्यांनी आपले घरदार चालवले. वडिलांचा हाच रोजगार सुरेश नाडर यांनी देखील पुढे चालवला. धारावीत राहत असताना अनेक संकट त्यांच्यावर आली मात्र ते कधीच डगमगले नाही. त्यांचा व्यवसाय त्यांनी सुरू ठेवला. मात्र, कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचा हा व्यवसाय बंद आहे. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे.
नाडार हे मुंबईतील सायन कोळीवाडा, गांधी मार्केट, प्रतीक्षा नगर या परिसरात आपला व्यवसाय करतात. यातून ते दर दिवसाला पंधराशे ते दोन हजार रुपये कमवतात. त्यातून त्यांना हजार रुपये नफा मिळतो. याच कमाईतून त्यांनी मुलीच्या लग्नासाठी काढलेले कर्ज फेडून घर चालवतात. त्यांच्या घरात पदवीला शिकणारे एक मुलगा, मुलगी आणि पत्नी आहे. कोरोनाच्या संकटामुळे त्यांचा व्यवसाय बंद आहे. त्यामुळे मुलीच्या लग्नासाठी काढलेले कर्जाचे हप्ते आणि घर चालवणे फार कठीण जात आहे, असे नाडार यांनी सांगितले.
मुंबईतील अनेक साध्या वस्त्यांमध्ये या इडलीवाल्यांचे काम चालते, पण याचे मुख्य केंद्र हे धारावीमध्येच आहे. मोठी झोपडपट्टी किंवा लेदरसह अन्य लघुउद्योगाचे मोठे केंद्र अशी पॉझिटिव्ह-निगेटिव्ह ओळख असलेल्या, धारावीच्या ९० फुटी रस्त्यावरून काटकोनात आत शिरणाऱ्या गल्ल्यांमध्ये कमला नगर, बालाजी नगर, राजीव गांधी मार्ग अशा वस्त्यांमध्ये इडलीवाले एकवटले आहेत. सकाळी सहा-सातच्या सुमारास येथील लहान-लहान गल्ल्यांमधून इडली-चटणीची पातेली घेऊन विक्रीसाठी बाहेर पडणाऱ्या इडलीवाल्यांची संख्या धारावी भागात साधारण 2 हजाराच्यावर आहे. या विक्रेत्यांचे लॉकडाउनमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, असे साऊथ इंडियन फोरमचे अध्यक्ष राजू नाडर यांनी ईटीव्हीला सांगितले.