मुंबई - पावसाळ्यात इमारती किंवा इमारतींचा काही भाग कोसळण्याच्या घटना घडतात. अशीच घटना आज (गुरूवारी) पुन्हा घडली. कुर्ला-पश्चिम येथे पालिका कार्यालयाजवळ असलेल्या इमारतीचा काही भाग गुरुवारी दुपारी कोसळला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
कुर्ला-पश्चिम सीएसटी रोड येथे तळ अधिक तीन मजली नेता इमारत आहे. या इमारतीला नुकतीच धोकादायक असल्याची नोटीस देण्यात आली होती. आज (गुरुवारी) दुपारी 12 च्या सुमारास या इमारतीचा एका कोपऱ्यातील भाग कोसळला. इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, 108 ची अॅम्ब्युलन्स, पालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पडलेल्या इमारतीचा ढिगारा बाजूला करण्यास सुरुवात केली आहे. या दुर्घटनेत अद्याप कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, याच इमारतीला जानेवारी महिन्यात आग लागल्याची माहिती पुढे आली आहे.
मुंबईत 443 इमारती धोकादायक -
दरवर्षी, पावसाळ्याच्या तोंडावर पालिकेतर्फे मुंबईतील अत्यंत धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात येते. शहर आणि उपनगरातील सर्व खासगी तसेच पालिकेच्या मालकीच्या इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. पालिकेच्या धोरणानुसार, 30 वर्ष जुन्या इमारतींची संरचनात्मक तपासणी केली जाते. त्यात ज्या इमारती धोकादायक आढळतात, अशा इमारतींना घरे रिकामी करण्यासाठी 354 ची नोटीस बजावली जाते. सी-वन या प्रकारात अर्थात अतिधोकादायक म्हणून गणल्या जातात. अशा अत्यंत धोकादायक 443 इमारती मुंबईत आहेत. गेल्या वर्षी ही संख्या 499 झाली होती. दोन वर्षांपूर्वी तब्बल 619 अतिधोकादायक इमारती आढळून आल्या होत्या.