मुंबई - कोरोना लॉकडाऊनचा बांधकाम व्यावसायाला मोठा फटका बसला असल्याचे उदाहरण समोर आले आहे. ज्या ग्राहकांनी काही कारणाने घरांचे बुकिंग रद्द केले आहे, त्यांना घराची आगाऊ रक्कम परत करणेही बांधकाम व्यावसायिकांना अशक्य होत आहे. एका सुनावणीदरम्यान एका बिल्डरने ही कैफियत महारेरासमोर (महाराष्ट्र भू संपत्ती नियामक प्राधिकरण) मांडली आहे. मात्र, अशी परिस्थिती असली तरी, ग्राहकाला रक्कम परत तर करावीच लागेल, असे महारेराने स्पष्ट केले आहे.
पुण्यातील 'वास्तूशोध समूहा'च्या एका प्रकल्पात दिलीप कर्नाटकी यांनी घर खरेदी केले. त्यासाठी लागणारी 60 टक्के आगाऊ रक्कमही त्यांनी भरली होती. मात्र, पुढे बिल्डरकडून करार करण्यास टाळाटाळ होऊ लागल्याने आणि काम सुरू होऊन घराचा ताबा वेळेत मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी घरखरेदी रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपली घरखरेदी रद्द करत आगाऊ रक्कम परत करण्याची बिल्डरकडे मागणी केली. मात्र, बिल्डरकडून काही केल्या रक्कम परत केली जात नसल्याने कर्नाटकी यांनी महारेरात धाव घेतली.
यावर, महारेरात सुनावणी झाली. त्यावेळी बिल्डरने कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे आमच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. आम्हालाच नव्हे तर, संपूर्ण बांधकाम क्षेत्राला याचा फटका बसला आहे. त्यामुळे ग्राहकांना रक्कम परत करणे आमच्यासाठी अवघड ठरत असल्याची कैफियत बिल्डरने मांडली. महारेराने बिल्डरची बाजू ऐकून आणि समजून घेतली खरी मात्र, नियमाप्रमाणे ग्राहकांना रक्कम परत करावीच लागणार, असे सांगितले. त्यामुळे आता बिल्डरांना ही रक्कम परत करावी लागणार आहे.