मुंबई : महागाईमुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. गेल्या काही महिन्यात दूध उत्पादक कंपन्यांनी दुधाच्या किमतीमध्ये वाढ केली होती. त्यानंतर आता मुंबईत दूध उत्पादक संघाने म्हशीच्या दुधात ५ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता मुंबईत जे दूध ९० रुपयांना मिळत होते. ते आता ९५ रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना म्हशीच्या दुधाच्या दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे.
दुधाची दरवाढ का : जोगेश्वरी येथील सौराष्ट्र पटेल समाज सभागृहात मुंबई दूध उत्पादक संघाची बैठक पार पडली. या बैठकीत पदाधिकारी वली पीर, कासम काश्मीर आणि चंद्रकुमार सिंग आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत दूध देणाऱ्या जनावरांच्या गवत, पेंड यांसारख्या खाद्यांचे दर वाढले आहेत. खाद्यांच्या दरवाढीसोबतच कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि इंधन दरवाढही झाली आहे. त्यामुळे सध्याच्या दरात दूध विक्री करणे अशक्य असल्याने दुधाच्या दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कशी होणार दरवाढ : दूध उत्पादक संघाच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे होलसेलच्या दरात ८० रुपयांवरून ८५ रुपये प्रतिलिटर दरवाढ करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. होलसेलच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना ९० रुपयांना मिळणारे दूध ९५ रुपयांना मिळणार आहे. ही दरवाढ ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत असणार आहे.
इतर दुधाच्या किमतीतही वाढ : मुंबईमध्ये इतर दुधाच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. गोवर्धन या दुधाच्या दरामध्ये २ फेब्रुवारीपासून दोन रुपये प्रति लिटर वाढ लागू झाली आहे. त्यामुळे गोवर्धन हे दूध ५४ रुपये ऐवजी ५६ रुपये प्रति लिटर या दराने विकले जात आहे. मुंबईमध्ये सुमारे अडीच लाख नागरिक या दुधाचा वापर करतात. अमोल कंपनीने आपल्या दुधाच्या किमतीमध्ये तीन रुपयांनी वाढ केलेली आहे. गेल्या वर्षातील ऑगस्ट पासून आतापर्यंत म्हणजे मार्चपर्यंत तीन वेळा तर २०२१ पासून पाच वेळा वाढ केलेली आहे.
3 फेब्रूवारीला दरवाढ : महाराष्ट्रात 3 फेब्रूवारीला दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. सहकारी दूध संघांच्या 22 संघटनांनी दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ केली होती. कात्रज, चितळे, थोटे, थोरात, सोनई, पूर्ती दुधाचे दर वाढले होते. मंगळवारी 2 तारखेला सायंकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहकारी दूध संघांची व महाराष्ट्रातील 22 प्रमुख खासगी संघांची बैठक आयोजित करण्यात आली होती. दूध पिशवी पॅकिंग, वाहतूक खर्च, दूध खरेदीच्या दरवाढला कारणीभूत ठरतात.
बिगर राज्य दूध संघांची विक्री : बिगर राज्य दूध संघांची विक्री राज्याच्या बाजारपेठेत वाढली आहे. त्यापार्श्वभूमीवार स्पर्धा टाळण्यासाठी दुधाच्या किरकोळ दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे ग्राहकांवर बोजा पडू नये म्हणून काही दूध संस्थांनी प्रमुख वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांचे कमिशन (सर्व्हिस चार्ज) कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे काही दूध आस्थापनांचे विक्री दर स्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली.