मुंबई : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, सरकारला शेतकऱ्यांचे काहीच गांभीर्य नाही. राज्यात सर्वात महत्त्वाचा व प्रमुख मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आहे. सुरुवातीला झालेला अवकाळी पाऊस व मागील दोन दिवस झालेली गारपीठ याने शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले आहेत. कर्मचारी संपावर आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होत नाहीत, अशात सरकार काय मदत देणार आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले की, आज आम्ही सभागृहात याविषयी चर्चा करण्याची मागणी केली तरी सुद्धा त्यांनी यावर चर्चा करण्यास नकार दिला. यावरून शेतकऱ्यांविषयीचा सरकारला असलेला कळवळा समजून येतो.
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत : सरकारी कर्मचारी संपावर आहेत. त्यांच्या मागण्या मान्य होत नाही आहेत. तर दुसरीकडे ९५ टक्के सरकारी कर्मचारी यांचे घरामध्ये पैसे ठेवायला जागा नाही, असे सरकारमधील आमदार सांगत आहेत. हे फार चुकीच आहे. सर्वच अधिकारी भ्रष्ट असतात असे नाही, परंतु अशा पद्धतीची वक्तव्य करणे नेत्यांनी आणि आमदारांनी टाळली पाहिजेत असेही थोरात म्हणाले.
बागेश्वर बाबाला सुविधा का? : बागेश्वर बाबाच्या मेळाव्यामध्ये काय प्रकार घडला तो सर्वांनी बघितला आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले की, जो मनुष्य संतांची अवहेलना करतो त्याच्यासाठी सरकार सुविधा पुरवत आहेत. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये चोऱ्या झाल्या. परंतु त्याकडेही सरकार दुर्लक्ष करत आहे.
सरकारची दडपशाही? : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रश्नावर बोलताना थोरात म्हणाले की त्यांनी असे कुठल्याही पद्धतीचे चुकीचे विधान केलं नाही आहे. ज्याने त्यांना अटक करावी लागेल. असं काही घडलं नाही आहे. परंतु सरकार दबाव तंत्राचा उपयोग करत आहे. केंद्रात व राज्यातही यांच सरकार आहे. सरकारची दडपशाही चालू असल्याचेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.