मुंबई - केंद्र सरकारने भारतातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी असलेली भारत पेट्रोलियम कंपनीचे खासगीकरण करण्याचे धोरण आखल्याने देशातील कामगार संघटना व कामगार वर्गात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. त्याविरोधात भारत पेट्रोलियम कंपनीच्या मुंबई कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी माहुल गेट ते चेंबूर येथील आंबेडकर गार्डन असा मोठा मोर्चा काढला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन कामगार व कंपनी वाचवण्याची मागणी कामगार करत होते.
गेल्या 4 वित्तीय वर्षादरम्यान भारत पेट्रोलियम कंपनीने कर भरल्यानंतर एकूण 31 हजार कोटी रुपयांचा फायदा मिळवला आहे. ही कंपनी एका वित्तीय वर्षात सरकारी खजिन्यात सुमारे 96 हजार कोटी रुपयांची रक्कम कराद्वारे जमा केले आहे. याशिवाय बीपीसीएल जवळ 34 हजार कोटी रुपयांची राखीव व अतिरिक्त रक्कम आहे. या कंपनीच्या मालमत्तेचे 2 लाख कोटीपेक्षा जास्त मूल्य आहे. पण, सध्याचा बाजार भाव लक्षात घेता सरकार केवळ 60 हजार कोटी रुपयांत विक्रीस काढली आहे. अशा प्रकारे सामान्य जनतेला लुटले जात असल्याचा आरोप बीपीसील कंपनी कामगार संघटना उपाध्यक्ष अशोक माहुलकर यांनी सांगितले.
सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात हजारो कर्मचाऱ्यांनी हातात काळे झेंडे घेऊन हा मोर्चा काढून खासगीकरण रद्द करण्याची मागणी केली आहे. या कंपनीतून गरिबांसाठी दिल्या जाणाऱ्या उज्वला योजनेतून सिलिंडर त्याचबरोबर मच्छिमारांना पेट्रोल-डिझेल सुद्धा वितरित केले जाते. यामुळे काही परिणाम इतर उत्पादनावर सुद्धा झाला असल्याचे कामगाराचे म्हणणे आहे.
हेही वाचा - रुग्णालयाच्या नावाने होणारी ८४२ झाडांची कत्तल वृक्ष प्राधिकरण सदस्यांनी रोखली