मुंबई : मुंबई उच्च न्यायालयामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याने 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केलेला आहे. सिद्दिकीने हा दावा त्याची विभक्त पत्नी आलिया व भाऊ शमशुद्दीन यांच्या विरोधात दाखल केलेला आहे. नवाजउद्दीन सिद्दिकी याला पत्नी आणि भाऊ हे दोघेही बदनाम करतात. त्यांनी यापुढे कोणतीही अशी बदनामी करू नये. तसेच समाज माध्यमावर त्याबाबतचा कोणताही बदनामीकारक असा मजकूर प्रसारित करू नये, अशी मागणी नवाजउद्दीन सिद्दिकीने याचिकेत केलेली आहे.
कोर्टात हजर राहण्याचे निर्देश : या याचिकेवर 30 मार्चला सुनावणी झाली होती. नवाजसह त्याची पत्नी आलिया, दोन्ही मुले आणि भाऊ शमशुद्दीन यांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आणि त्याची विभक्त पत्नी अंजना पांडेमध्ये वादविवाद सुरू आहे. नवाजुद्दीनचा भाऊ शमशुद्दीन देखील त्यामध्ये सामील आहे. आपली विभक्त पत्नी आणि भाऊ हे नवाजुद्दीनचा छळ, बदनामी देखील करतात. त्यामुळे नुकसान भरपाई म्हणून 100 कोटी रुपयांची मागणी केलेली आहे. यासंदर्भातील सुनावणी 30 मार्च रोजी पार पडली होती.
20 कोटी रुपयांचा आर्थिक गैरवापर : मागील पंधरा वर्षांपूर्वी नवाजुद्दीनने आपले बँकेचे व्यवहार करण्यासाठी भाऊ शमशुद्दीन याला क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड दिले होते. तसेच त्याबाबतचे अनेक आर्थिक व्यवहार करण्याचे काम विश्वासाने भावावर सोपवले होते. मात्र याचिकेमध्ये शमशुद्दीनने फसवणूक केल्याचा दावा नवाजुद्दीनने केलेला आहे. त्याने नवाजुद्दीनच्या विभक्त पत्नीला खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रवृत्त केले. त्याशिवाय त्यांनी दोघांनी मिळून 20 कोटी इतक्या रुपयांचा आर्थिक गैरवापर केला आहे, असा आरोपदेखील केला आहे. नवाजुद्दीनने दाव्याच्या समर्थनार्थ देखील मांडले आहे की, शमशुद्दीनची व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली होती. परंतु त्याचे वागणे पाहून 2020 मध्ये त्याच्याकडील काम काढून घेण्यात आले होते. या प्रकरणावर आज सुनावणी आहे.