मुंबई - सध्या चर्चेचा विषय ठरलेली अभिनेत्री कंगना रणौतच्या मुंबईतील पाली हिल स्थित कार्यालयातील अतिक्रमण हटवण्यासाठी आज मुंबई महानगरपालिकेचे पथक दाखल झाले. महानगरपालिकेने बजावलेल्या नोटिशीला कंगना रणौतकडून 24 तासांत उत्तर न मिळाल्यामुळे कार्यालय तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली. मात्र, या कारवाईच्या विरोधात कंगनाच्या वकिलाकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली. त्यावर महानगरपालिकेने आपली कारवाई थांबवावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील कुठल्याही महानगरपालिकेच्या हद्दीतील अतिक्रमणे ही 30 सप्टेंबरपर्यंत तोडली जाऊ नये, असे आदेश आहेत. असे असताना कंगना रणौतच्या कार्यालयात कुठल्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली? असा प्रश्न कंगनाच्या वकिलांकडून उपस्थित करण्यात आला होता. यासंदर्भात तासभर सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला अतिक्रमण हटवण्याचे काम तत्काळ थांबवण्यास सांगितले. यासंदर्भात उत्तर देण्यासाठी पालिकेला गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ दिली आहे.
दरम्यान, सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात उडी घेऊन व मुंबईवर वादग्रस्त व्यक्तव्य केल्यानंतर वादात सापडलेली अभिनेत्री कंगना रणौत आज मुंबईत दाखल झाली आहे. केंद्र सरकारने तिला 'वाय' दर्जाची सुरक्षा पुरवली आहे.