नवी मुंबई - खारघर सेक्टर 15 येथील मल्टिस्पेशालिटी रुग्णालयातील एका बनावट डॉक्टरवर पनवेल महानगरपालिका आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. रोहित गुप्तेश्वर यादव (27) असे बनावट डॉक्टराचे नाव आहे. खारघरच्या डी मार्ट जवळील सेक्टर 15 या ठिकाणी खारघर मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटलमध्ये विनाडिग्री बनावट डॉक्टर रूग्णांची तपासणी करुन उपचार करत असल्याची माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना मिळाली. हा बोगस डॉक्टर खारघर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात निवासी वैद्यकिय अधिकारी म्हणून कार्यरत होता.
बनावट रुग्णांना पाठवून बोगस डॉक्टरचा पर्दाफाश
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी पनवेल महानगर पालिकेच्या डॉक्टरांना बोलावून या प्रकाराची माहिती दिली. तसेच, मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटलमध्ये बनावट रुग्णांना पाठवले. बोगस डॉक्टर रोहितने रुग्णाला कोणताही आजार नसताना रुग्णालयाखाली असलेल्या मेडिकलमधून औषधे आणायला सांगितली. शिवाय, 1000 रुपये तपासणी शुल्कही घेतली.
सापळा रचून बनावट डॉक्टरला अटक
खारघर पोलिसांनी सापळा रचून संबधित रुग्णालयात छापा मारला आणि बनावट डॉक्टर आरोपी रोहित गुप्तेश्वर यादव याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली. त्यात, त्याने गोवंडी शिवाजीनगर मानखुर्द येथे कंपाऊंडरचे काम केले आहे. येथे तो आरएमओ म्हणून रुग्ण तपासात असल्याचे निष्पन्न झाले.
बनावट डॉक्टरला 3 दिवस पोलीस कोठडी
पनवेल मनपाचे मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील डॉ. भक्तराज भोईटे, डॉ. सुरेश पंडित, विजय महाले, नर्स संगीता पाटील, विकास तीरगुळ यांच्या मदतीने सापळा रचून या बोगस डॉक्टरला पकडले. स.पो.नि. मानसिंग पाटील यांनी त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 3 दिवस पोलीस कोठडीत सुनावली आहे.
सखोल चौकशीची खारघरकरांची मागणी
या बनावट डॉक्टरने कितीतरी रुग्णांना तपासून चुकीचे औषधोपचार केले आहेत. त्यामुळे निष्पाप लोकांचा जीवही गेला आहे. कोरोनाच्या नावाखाली रुग्ण दगावले असे सांगून त्याने खारघरकरांची लुट व फसवणूक केली आहे. त्यामुळे त्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी खारघर रहिवाशांकडून होत आहे. याप्रकरणी स.पो.नि. मानसिंग पाटील अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - अदर पूनावाला पुण्यात परतले, मोठ्या नेत्यांकडून धमक्या मिळत असल्याने सोडला होता देश