मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे मुंबईत रोज शेकडो रुग्ण आढळून येत आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पालिकेकडे पुरेशा प्रमाणात रुग्णालये आणि खाटा नाहीत. त्यासाठी पालिका खासगी रुग्णालयातील 20 टक्के खाटा आपल्या ताब्यात घेणार असून त्यावर कोरोना रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. खासगी रुग्णालयातील खाटा आणि रुग्णांची परिस्थिती पाहून पालिकेच्या आपत्कालीन विभागातील आयएएस अधिकाऱ्यामार्फत खाटांचे नियोजन केले जाणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जगभरात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईतही 9 हजार कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. मुंबई महापालिकेकडून कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यासाठी पालिकेने आपली बहुतेक रुग्णालये कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव ठेवली आहेत. मात्र, मुंबईत रुग्ण वाढत असल्याने पालिका रुग्णालयांची क्षमता संपली आहे. त्यातच कोरोनाच्या रुग्णांची खासगी रुग्णालये लूटमार करत असल्याचे प्रकार समोर आले आहे.
यामुळे कोरोनाबाधित रुग्णांवर योग्य उपचार करता यावेत म्हणून मुंबई महापालिका खासगी रुग्णालयातील विलगीकरण कक्ष आणि अतिदक्षता विभागातील करोना रुग्णांसाठी असलेल्या खाटांपैकी 20 टक्के खाटा आपल्या ताब्यात घेणार आहे. या खाटांवर कोणत्या रुग्णांना पाठवायचे याचा निर्णय पालिका घेणार आहे. कोरोना रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचाराचा खर्च आयुष्मान भारत किंवा महात्मा फुले योजनेमधून केला जाणार आहे. यामुळे रुग्णांवर खासगी रुग्णालयात मोफत उपचार होणार आहेत.
आयएएस अधिकारी करणार खाटांचे नियोजन
सध्या रुग्णांना खाटा उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे गंभीर प्रकृतीच्या रुग्णांवर वेळेत उपचार करता यावेत म्हणून या खासगी रुग्णालयातील खाटांचा वापर केला जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण विभागात आयएएस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली खाटांची उपलब्धता आणि रुग्णांची प्रकृती यानुसार नियोजन केले जाणार आहे. मुंबईमधील नानावटी, के.जे.सोमय्या, फोर्टिस (मुलुंड), एल. एच. हिरानंदानी, पी.डी. हिंदुजा, ग्लोबल, सैफी, लहान मुलांचे एनएच एसआरसीसी, जसलोक, ब्रीच कॅण्डी, वोक्हार्ट, बॉम्बे, पोद्दार, लीलावती, रहेजा, भाटिया आदी खासगी रुग्णालयात 20 टक्के खाटा राखीव ठेवल्या जाणार आहेत.
हेही वाचा - राज्य सरकारचे तळ्यात-मळ्यात; उपस्थितीबाबत पुन्हा नवा आदेश जारी