मुंबई - मागील दोन आठवड्यांपासून मुंबईमध्ये कोरोनाची रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढती रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यामुळे लोकांमध्ये कोरोना संपला किंवा आटोक्यात आला असा समज झाला आहे. त्यामुळे लोकांमध्ये बेफिकीर वृत्तीही वाढली आहे. आता सर्वसामान्य लोकांना रेल्वे आणि लोकल प्रवासाची परवानगी दिल्यामुळे रेल्वे स्थानकं, भाजी मंडई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अशा ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळेच रूग्णसंख्येत वाढ होत आहे. मुंबईतील दादर भाजी मार्केट आणि फुल मार्केट परिसरातील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी महानगरपालिका प्रशासन आटोकाट प्रयत्न करत आहे.
लोकांची बेफिकरी -
दादरच्या भाजी मार्केट आणि फुल मार्केट परिसरात सकाळी लोकांची प्रचंड गर्दी असते. आरोग्य विभागाने घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक त्रिसूत्रींपैकी सोशल डिस्टंन्सिंग आणि मास्क वापरण्याबाबत लोक जागरूक नसल्याचे चित्र या ठिकाणी दिसते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर क्लीन-अप मार्शल आणि पोलीस दंडात्मक कारवाई करत आहेत. तरी देखील अनेक विक्रेते आणि नागरिक विनामास्क किंवा मास्क हनुवटीवरती ठेवून बाजारात फिरताना दिसतात.
इतर ठिकाणीही हीच परिस्थिती -
दादर हे प्रातिनिधिक स्वरूपातील उदाहरण आहे. उर्वरित मुंबईमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. भायखळा भाजी मार्केट, क्रॉफर्ड मार्केट आणि इतर विविध मार्केटमधील गर्दीवर देखील पालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र, तरीही लोक नियमांचे पालन करत नसल्याचे चित्र सध्या प्रसार माध्यमांमध्ये दिसत आहे. प्रतिबंधात्मक लस सोडली तर कोरोनावर कोणतेही खात्रीचे औषध नाही. त्यामुळे नाका-तोंडावर मास्क परिधान करणे, सोशल डिस्टंन्सिंग पाळणे आणि सॅनिटायझर किंवा साबणाने वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा वापर करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासन करत आहे.
हेही वाचा - राज्यातील कोरोना रुग्णसंख्या चिंताजनक; एकट्या नागपुरात 23 जणांचा मृत्यू