मुंबई - दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते. रस्ते, रेल्वे, विमान वाहतूकीवर परिणाम होऊन मुंबई शहर ठप्प होते. यंदाही मुंबईची तुंबई झाली. तरीही पाणी साचण्याच्या तक्रारींमध्ये घट झाल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. यामुळे एकीकडे मुंबईची तुंबई होत असताना पालिका प्रशासन मात्र पाणी साचण्याच्या तक्रारी कमी आल्याचे आकडे पुढे करून स्वत:ची पाठ थोपटून घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
पाणी साचण्याच्या घटना -
एक ते दोन तास सतत पाऊस पडला तर मुंबईत अनेक विभागात रस्त्यावर, विभागात, रेल्वे रुळावर पाणी पाणी साचल्याचे प्रकार समोर येतात. मुंबईत दरवर्षी सुमारे २५०० एमएलडी म्हणजेच दशलक्ष लिटर इतका पाऊस पडतो. मुंबईची भौगोलिक परिस्थिती, शहराच्या बाजूला असलेला समुद्र किनारा यामुळे भरतीच्या वेळी मुंबई शहरातील पाणी समुद्रात सोडता येत नसल्याने हे पाणी शहरात राहून मुंबईची तुंबई होते. मुंबई शहरात २५० हून अधिक भाग असे आहेत. ज्या ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहते. या पाण्याचा निचरा होण्यासाठी तासनतास लागतात. यंदा १५ तासाहून अधिक वेळ झाला तरीही हिंदमाता येथील पाण्याचा निचरा झाला नव्हता. किंगसर्कल येथे तर १५ ते २० मिनिटे पाऊस पडला तरी पाणी साचून रस्ते वाहतूक ठप्प होते.
शहर विभागात पहिल्यांदाच पाणी साचले-
मुंबईत कोस्टल रोडचे काम सुरू आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी समुद्रात भराव टाकण्यात आला आहे. याचा फटका यंदा मुंबईला बसला. ज्या शहर विभागात पावसाचे पाणी साचत नव्हते त्या उच्चभ्रू वस्त्यांमध्येही पाणी साचले. मंत्रालय, मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, मुंबई महापालिका मुख्यालय मार्ग येथील मेट्रो थिएटर पासून कामा रुग्णालयापर्यंत रस्त्यावर पाणी साचले होते. मुंबई शहरात २६ जुलै २००५ च्या जलप्रलयानंतर पहिल्यांदाच इतके पाणी साचले.
स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न -
मुंबईत पावसाचे पाणी साचू नये म्हणून पालिकेने २५ मिलिमीटर असलेल्या पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य जल वाहिन्यांची क्षमात दुप्पट करून ५० मिलिमीटर इतकी केली आहे. पावसाचे पाणी समुद्रात सोडता यावे म्हणून पंपिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत. पावसाचे पाणी गटार आणि नाल्याच्या माध्यमातून पंपिंग स्टेशन पर्यंत सोडता यावे यासाठी पाणी साचण्याच्या ठिकाणी २७० ते ३०० पंप पालिकेकडून बसवण्यात येतात. त्यानंतरही १ जून ते ३० ऑक्टोबर दरम्यान १००६ पाणी साचण्याच्या तक्रारींची नोंद झाली आहे.
मागील वर्षी याच कालावधीत २२१४ तक्रारी नोंद झाल्या होत्या. एकीकडे मुंबईची होणारी तुंबई, शहरात पहिल्यांदाच साचलेले पाणी याचा विचार न करता, मुंबईत पाणी साचण्याच्या १००६ तक्रारी नोंद झाल्याची आकडेवारी समोर करून पालिका प्रशासन मात्र आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
हेही वाचा - मुंबई मेट्रोची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
हेही वाचा - नव्या वर्षात महापालिका मुख्यालयात पर्यटकांसाठी 'हेरिटेज वॉक', आदित्य ठाकरेंकडून आढावा