मुंबई - मुंबईत गेल्या वर्षी मार्चपासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. ऑगस्ट महिन्यात काही प्रमाणात कोरोना आटोक्यात आला होता. मात्र, सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवादरम्यान झालेल्या गर्दीमुळे कोरोना पुन्हा वाढला होता. आता देखील १ फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर ज्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या त्या उपाययोजनांची पुन्हा अंमलबजावणी
करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता असल्याने रुग्णालये हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहेत. एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील हायरिस्क १५ व्यक्तिंचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याचे आदेश दिल्याची माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
खबरदारी म्हणून यंत्रणा तैनात -
मुंबईत गेल्या अकरा महिन्यांच्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला होता. मात्र, मुंबईकरांनी कोरोनाचे नियम न पाळल्याने कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. मुंबईत गेल्या २० दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. जानेवारीत ३०० ते ४०० दरम्यान असलेली रुग्णसंख्या आता ९००च्या वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या प्रमुख उपस्थितीत खासगी लॅब, पालिका दवाखाने, खासगी दवाखाने, कोरोना सेंटर्सची महत्त्वपूर्ण बैठक झाली. सप्टेंबर २०२० मध्ये मुंबईतील रुग्णसंख्या अडीच हजारांवर गेली होती. यावेळी पालिकेने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे कोरोना नियंत्रणात आला होता. सद्यस्थितीत सप्टेंबरसारखी स्थिती नसली तरी खबरदारी म्हणून पालिकेने सर्व यंत्रणा तैनात करण्याची कार्यवाही सुरू केल्याची माहिती काकाणी यांनी दिली. रुग्णालये, जम्बो सेंटरमधील सर्व बेड, आयसीयू, ऑक्सिजन अॅक्टिव्ह करावेत, सुरक्षा-अग्निशमन यंत्रणा, केटरिंग सर्व्हिस सज्ज ठेवण्याचा सूचना संबंधितांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
कारवाईचा बडगा -
रुग्णांचे चुकीचे पत्ते आणि मोबाईल नंबरमुळे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये काही रुग्ण सापडत नसल्याचे प्रकार समोर आले होते. हे सक्रिय रुग्ण समाजात फिरत राहिल्यामुळे कोरोना झपाट्याने वाढत होता. या पार्श्वभूमीवर पॉझिटिव्ह रुग्णांचा पत्ता, मोबाईल नंबर पिनकोडसह नोंदवून खात्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास त्याला शोधून त्याच्यावर त्वरित उपचार करणे शक्य होणार आहे.
जम्बो कोविड सेंटर्स सज्ज -
महानगरपालिकेच्या सातही जम्बो कोविड सेंटर्ससह लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी 'कोरोना केअर सेंटर-१' आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी ‘कोरोना केअर सेंटर-२’ आवश्यकतेनुसार सुरू करण्यासाठी तयार ठेवण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. पालिकेकडे २५ हजारांपेक्षा जास्त बेड, १७ हजार ७ आयसीयू, ६ हजार ८६९ ऑक्सिजन आणि १ हजार ३३ व्हेंटिलेटरर्स आहेत.
एकूण ५१७ कोरोना केअर सेंटर्स -
महानगरपालिकेकडे एकूण ‘कोरोना केअर सेंटर - १’ची संख्या ३३६ आहे. रुग्णसंख्या घटल्याने यातील फक्त २६ सुरू आहेत. यामध्ये २४ सेंटर्स ‘बफर’ म्हणजेच दोन दिवसांत सुरू करता येतील तर रिझर्व्ह प्रकारात २८६ केंद्र असून ती ८ दिवसांत कार्यान्वित करण्यात येतील. तर ‘कोरोना केअर सेंटर-२’ची संख्या १८१ असून यातील केवळ ७ सुरू आहेत. ३० ‘बफर’ तर १४४ रिझर्व्ह प्रकारात आहेत. उपलब्ध बेडपैकी ७५ टक्के बेड आणि ७५ टक्के आयसीयू रिक्त आहेत.
१८टक्केच कोरोनाबाधित -
मुंबईत २१ फेब्रुवारीला ५ हजार ६४९ सक्रिय कोरोना रुग्ण होते. यातील ८२ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचे समोर आले. त्यामुळे मुंबईत आढळणाऱ्या रुग्णांमध्ये १८ टक्केच रुग्ण कोरोनाबाधित आढळत असल्याचे काकाणी यांनी सांगितले. सद्यस्थितीत २६६ रुग्णांची प्रकृती क्रिटिकल असून त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्यात येत आहेत.