मुंबई - प्रथम मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करून नंतर 'मी मुंबईत येत आहे, दम असेल तर मला रोखून दाखवावे,' असे बेताल वक्तव्य करणारी अभिनेत्री कंगना रणौत अडचणीत आली आहे. कंगनाच्या पाली हिल येथील 'मणिकर्णिका' कार्यालयाची महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला बेकायदेशीर बांधकाम केल्या प्रकरणी 354 कलमान्वये नोटीस पाठवण्यात आली आहे. हे बेकायदेशीर बांधकाम कंगनाने स्वतःहून तोडले नाही तर, पालिका या कार्यालयावर कारवाई करू शकते.
अभिनेत्री कंगना रणौत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरसोबत केली आहे. त्यानंतर सरकारमधील अनेक नेते आणि कंगना यांच्यात ट्विटरवर जोरदार शाब्दिक युद्ध रंगले. मुंबई कंगनाची कर्मभूमी असताना तिने असे वक्तव्य केल्याने शिवसेनेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. कंगनाच्या विरोधात शिवसेनेने विविध ठिकाणी आंदोलनही केले आहे.
सोमवारी महानगरपालिका अधिकाऱ्यांनी तिच्या पाली हिल येथील कार्यालयाची पाहणी केली. कार्यालयाचे मोजमाप घेऊन बेकायदेशीर बांधकाम झाले आहे का याचीही तपासणी करण्यात आली. तथापि, आपल्या कार्यालयात पालिका अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने घुसून मोजमाप घेतले, ते माझे कार्यालय तोडणार आहेत, असे ट्विट कंगनाने कालच केले होते. त्यानंतर आज पालिकेने कंगनाला बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी 354 कलमान्वये नोटीस बजावली आहे.
354 कलम काय म्हणते -
एखाद्याने अनधिकृत बांधकाम केले असल्यास त्याला महानगरपालिका 354 कलमान्वये नोटीस देते. ही नोटीस दिल्यावर बांधकाम करणाऱ्या व्यक्तीने आपले बांधकाम स्वत: तोडायचे असते. संबंधित व्यक्तीने बेकायदेशीर बांधकाम स्वत: तोडले नाही तर पालिका हे बांधकाम तोडते.