मुंबई - पवई-आरे रोड जोडणारा मिठी नदीवरील ब्रिटिश कालिन पूल धोकादायक झाला आहे. 2019 मध्येच हा पूल धोकादायक असल्याचा अहवाल देण्यात आला होता. गेल्या दीड वर्षात या पुलाच्या पुनर्बांधणीकडे दुर्लक्ष केल्याने हा पूल अखेर अतिधोकादायक झाल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर पूल दोन्ही बाजुंनी बंद करण्यात आलेला आहे. हा पूल बंद केल्याने स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एस’ विभागातील प्रभाग क्रमांक १२१ मधील मिठी नदी आरे मार्गावरील पुलाची प्रमुख अभियंता (पूल) या विभागाने नेमणूक केलेल्या संरचनात्मक सल्लागाराद्वारे सदर पुलाच्या तपासणी अंती पूल कमकुवत झाला असून कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीसाठी सुरक्षित नसल्याचे नमूद केले. त्याकरिता जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर पूल दोन्ही बाजुंनी बंद करण्यात आलेला आहे. तरी नागरिकांना व वाहन चालकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी महानगरपालिकेला व वाहतूक पोलीसांना योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
2019 मध्ये धोकादायक जाहीर -
सदर पूल जीर्ण झाल्याने 04 मे, 2019 पासून अवजड वाहनांकरिता बंद करण्यात आला होता. त्यामुळे बेस्ट बसेसची वाहतूक सुद्धा मागील 20 महिन्यांपासून बंद आहे. परंतु त्या जागी नवीन पूल उभारणीसाठी महानगरपालिका प्रशासनातर्फे कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. अशातच सदर जीर्ण पुलाच्या खालून मलनिःस्सारण वाहिनीचे खोदकाम चालू करण्यात आले, त्यामुळे सदर जीर्ण झालेल्या पुलाला हादरे बसून, सदर पुलाची पडझड चालू झाली आहे. त्यामुळे आजपासून सदर पूल संपूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अशात येथील नागरिक जीव मुठीत धरून या पूलावरून ये-जा करत आहेत. सदर जीर्ण पुलाच्या ठिकाणी नवीन पूल उभारण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका प्रशासनातर्फे कोणताही प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला नाही. त्यामुळे हा पूल कोसळून दुर्घटना झाल्यावर प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
दोन आठवड्यात टेंडर -
शिवरेज प्रोजेक्टचे पाईप टाकण्याचे काम सद्या सुरू असून या कामात होणाऱ्या हादऱ्यामुळे पुलाला धक्का बसला आहे. पुढील दोन आठवड्यात पुलाच्या कामाचे टेंडर पास करून पुलाचे काम करणार आहे. या मार्गावर वाहने बंद केली आहे. आपत्कालीन परिस्थितीत या पुलावरून अॅम्ब्युलन्सला जाण्याची परवानगी असेल, असे स्थानिक नगरसेविका व बाजार उद्यान समितीच्या अध्यक्षा चंद्रावती मोरे यांनी दिली.
हेही वाचा - राणी बागेत पुढील वर्षी वाघांच्या बछड्यांचीही डरकाळी ऐकायला मिळण्याची शक्यता
हेही वाचा - बच्चे कंपनीची आवडती राणीबाग लवकरच होणार खुली