मुंबई- देशभरात 22 मार्चपासून लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवेची दुकानेच उघडली जात आहेत. त्यातच अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या आरोग्य आणि आयटी क्षेत्रातील यंत्रे बिघडल्याने दुरुस्त करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू मिळाव्यात म्हणून इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअरच्या दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिले आहेत.
महिनाभराहून अधिक लॉकडाऊन असल्याने या कालावधीत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आरोग्य विभाग आणि आयटी विभागातील अनेक यंत्रे बंद पडली आहेत. ती यंत्रे दुरुस्त करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्येच मिळत असल्याने ही दुकाने सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. एका रस्त्यावर एकच हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिकचे दुकान उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने 22 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन जाहीर केला. 4 मे पासून 3 रा लॉकडाऊन जाहीर करताना काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली. दारूच्या दुकानांसह अत्यावश्यक सेवा नसलेली एका रस्त्यावरील 5 दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र तळीरामांनी सुरक्षित अंतर न ठेवल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची भीती असल्याने पालिका आयुक्तांनी अत्यावश्यक सेवेची दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला.