मुंबई - उपनगरातील नद्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दहिसर, पोयसर आणि ओशिवरा नद्यांमधील प्रदूषण, अरुंद खोली, पाण्याची गुणवत्ता आदी, सुधारणा करून नद्यांना पुनरुज्जीवित करण्यात येणार आहे. तसेच मिठी नदीच्या सौंदर्यीकरणासाठी १३५ कोटींचा निधी खर्च करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
झोपडपट्टयातून टाकण्यात येणारे सांडपाणी, नदीकिनाऱ्याच्या कारखान्यातून सोडण्यात येणारे रासायनिक पाणी, तबेल्यातून टाकण्यात येणारे जनावरांचे मलमूत्र यामुळे या नद्यांतील प्रदूषण मोठया प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे नद्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. तेथील जलचर प्राण्यांनाही धोका निर्माण झाला आहे. नद्यांचे प्रदूषण दूर करून त्यांचे पुनरुज्जीविकरण तसेच सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामामध्ये नद्यांचे रुंदीकरण, नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता सुधारणे, नद्यांच्या पाणलोट क्षेत्रातून नदीत होणारे प्रदूषण रोखणे यांसह मलनिःसारण वाहिन्यांचे जाळे, नद्याकाठचे रस्ते आदी कामांचा समावेश आहे. या तिन्ही नद्यांचा प्रकल्प अहवाल प्रशासनाकडून तयार करण्यात येत आहे. लवकरच याकरता निविदा काढण्यात येतील, अशी माहिती प्रशासनाने दिली.
मिठी नदीचे सौंदर्यीकरण -
मिठी नदीच्या सौंदर्यीकरणाचा व मलनिःसारण समस्येचा व्यवस्थापन आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. चार टप्प्यात हे काम केले जाणार आहे. सेवा रस्त्याचे बांधकाम आणि बिन पावसाळी प्रवाह वळवण्याकरीता इंटरसेप्टरचे बांधकाम करून नदीचा प्रवाह वळवून ८ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या मलजल प्रक्रिया केंद्रात आणले जाणार आहे. पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. तर तिसऱ्या टप्प्यांमध्ये फ्लड गेट्स बांधणे, टप्पा ४ मध्ये बापट नाला व सफेद पूल नाला येथील घाटकोपर वेस्ट वॅाटर ट्रिटमेंट फॅसिलिटीपर्यंत नवीन बोगद्याचे काम केले जाणार आहे. यासाठी २७० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात १३५ कोटी इतकी भरीव तरतूद केली आहे.