मुंबई : कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी सुजित पाटकर यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. सुजित पाटकर हे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. पाटकर यांच्यासह ईडीने काल रात्री उशिरा डॉक्टर किशोर यांनाही अटक केली आहे. कोणताही पूर्वानुभव नसताना लाईफ लाईन हॉस्पिटलला कोविड सेंटरला वैद्यकीय साहित्य पुरवण्याचे कंत्राट दिले असल्याचा आरोप आहे.
100 कोटींचा हा कथित कोविड घोटाळा : डॉक्टर किशोर बिचुले हे महापालिकेचे डॉक्टर असून त्यांच्यावर दहिसर कोविड फिल्ड हॉस्पिटलची जबाबदारी होती. कोविड काळात सुचित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटलला कोणताही पूर्वानुभव नसताना कोविड सेंटरला वैद्यकीय साहित्य पुरवण्याचे कोट्यावधींचे कंत्राट दिल्याचे आरोप आहे. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी युवा सेनेचे सचिव सुरज चव्हाण, आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल आणि सुजित पाटकर यांची ईडीने चौकशी केली होती. तसेच आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांना काही कामानिमित्त दोन दिवसांसाठी श्रीलंका येथे जाण्यास देखील ईडीने अटकाव केल्याची माहिती मिळत आहे.
ईडी मागणार रिमांड : काही दिवसांपूर्वी ईडीने सुजित पाटकर आणि संजीव जयस्वाल यांच्या मुबंईतील घरावर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. सुरुवातीला याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून केला जात होता. परंतु कथित घोटाळ्याची रक्कम कोट्यवधींच्या घरात असल्याने ईडीकडे या प्रकरण वर्ग करण्यात आले आहे. हा अंदाजे एकूण 100 कोटींचा कोविड घोटाळा असल्याची माहिती सूत्राने दिली आहे. काल उशिरा रात्री याप्रकरणी सुजित पाटकर आणि डॉक्टर किशोर बिचुले यांना अटक केल्यानंतर आज ईडी रिमांडसाठी न्यायालयात हजर करणार आहे. लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेसने कोविड काळात केलेल्या घोटाळ्या प्रकरणी ईडीने ही छापेमारी सुरू केली होती. ईडीकडून 10 ठिकाणी शोध मोहीम करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे विभागाकडून केली जात होती. परंतु या प्रकरणात ईडीने त्यात उडी घेतल्याने या घोटाळ्यातील अनेकांचे धाबे दणाणले आहे. कोविड घोटाळा प्रकरणी 40 ते 60 कर्मचाऱ्यांचे जबाब ईडीने नोंदवले आहेत.
हेही वाचा -