मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे, वीज ग्राहकांनाही विजेचे जास्त बिल पाठवले जात आहे. याबाबत लोकप्रतिनिधी भेट घेण्यासाठी गेल्यावर महाव्यवस्थापक त्यांना भेट देत नाहीत. हा लोकप्रतिनिधींचा अवमान असल्याने बेस्ट महाव्यवस्थापकांविरोधात अविश्वास ठराव मांडण्यासाठी पालिकेचे विशेष सभागृह आयोजित करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महापौरांकडे एका पत्राद्वारे केली आहे.
कोरोनाच्या काळात बेस्टचे कर्मचारी जीवाची पर्वा न करता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना नियोजित स्थळी पोहचवत आहेत. त्यात बेस्टच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही. कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या नागरिकांना बेस्टकडून मोठ्या रकमेची बीलं पाठवली जात आहेत. त्यामुळे वीज ग्राहक हवालदिल झाले आहेत. परिणामी असंतोषाची लाट उसळली आहे. मात्र, याची दखल बेस्ट व्यवस्थापकांनी घेतली नाही आणि या संदर्भातील त्यांची भेट घेऊ इच्छिणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही ते वेळ देत नाहीत. त्यामुळे ते पदाचा गैरवापर करत एकप्रकारे लोकप्रतिनिधींचा अवमानच करत असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे.
लोकप्रतिनिधींचा अवमान करणाऱ्या महाव्यवस्थापकांना त्वरित हटवून त्यांची अन्य ठिकाणी बदली करण्याची मागणी रवी राजा यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. परंतु त्यानंतरही त्यांच्या वर्तनात बदल झाला नाही. त्यांच्याकडून लोकप्रतिनिधींचा अवमान करण्याचा प्रयत्न सुरुच आहे. त्यामुळे महाव्यवस्थापकांना पदावरून हटवून पुन्हा शासनाकडे पाठवावे, या मागणीसाठी विशेष सभागृह आयोजित करावे, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव, सपाचे गटनेते रईस शेख व जावेद जुनेजा या स्थायी समिती सदस्यांच्या स्वाक्षरीसह रवी राजा यांनी महापौरांना पत्र दिले आहे.