मुंबई - जगात कोरोना विषाणूचे संकट ओढवले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी मुंबईत विशेष असे साथ नियंत्रण रुग्णालय असावे, अशी इच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. त्यासाठी पालिकेने भूखंडही निश्चित केला. मात्र कोरोनामुळे आर्थिक गणित बिघडल्याने पाच हजार खाटांचे रुग्णालय उभारणे शक्य नसल्याचे पत्र पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी राज्य सरकारला दिले आहे. त्यामुळे मुंबईत आता साथ नियंत्रणासाठी विशेष रुग्णालय उभे राहिल का? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा मुंबईत पहिला रुग्ण आढळून आला. काही दिवसातच रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने पालिकेचे साथ नियंत्रणासाठी असलेले कस्तुरबा रुग्णालय कमी पडू लागले. पालिकेने आपली इतर रुग्णालये कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवली आहेत. इतकेच नव्हे तर वरळी, महालक्ष्मी, भायखळा, बिकेसी, मुलुंड, गोरेगाव, दहिसर आदी ठिकाणी पालिकेने जम्बो आणि इतर कोरोना केअर सेंटर उभारली. यावेळी पालिकेचे स्वतःचे साथ नियंत्रण रुग्णालय असावे, असा विचार पुढे आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालय उभारणीसाठी जमीन संपादन करण्याचे आदेश दिले होते.
मुख्यमंत्र्यानी दिलेल्या आदेशानुसार, पालिकेने जागेचा शोध घेत निविदा मागवल्या होत्या. दोन निविदाकारांनी निविदाही भरल्या. त्यापैकी जागेची निश्चिती केली. तसेच मुलुंड येथे ९१ हजार ९१४ चौरस मीटर जमीनीचा शोधही घेतला. मात्र कोरोनामुळे आर्थिक गणित बिघडले असून पाच हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यास येणारा खर्च पाहता सध्या हे रुग्णालय उभारणे शक्य नसल्याचे पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी राज्य सरकारला पत्र दिले आहे. पाच हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यास येणारा अंदाजे खर्च १२७ कोटी रुपये इतका असून हा खर्च पालिकेला शक्य नसल्याचे आयुक्तांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - महिलांसाठी लोकल सुरू करण्यासाठी पियुष गोयल यांच्याशी चर्चा करणार - पालकमंत्री
हेही वाचा - मुंबईकरांची मोनोकडे पाठ; सोमवारी फक्त 350 प्रवाशांचा प्रवास