मुंबई - महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरातील कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणण्यात मुंबई महापालिका प्रशासनाने चोख आणि अतुलनीय कामगिरी बजावली आहे. याचीच दखल घेत इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांचा “आयएसीसी कोव्हिड क्रुसेडर्स २०२०” पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन स्वरुपात झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात आयुक्त चहल यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि मुंबईतील अमेरिकन दुतावास यांच्याद्वारे संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आला आहे. भारतातील प्रशासकीय अधिकारी संवर्गातून इकबाल सिंह चहल हे विजेते ठरले आहेत. या पुरस्कार संवर्गासाठी प्रारंभी ७६ जणांची नावे विचाराधीन होती. पुरस्कारासाठी ठरवलेल्या निकषांच्या आधारे ४१ जणांची नावे नामांकन म्हणून निश्चित करण्यात आली. प्रतिष्ठीत व तज्ज्ञ व्यक्तिंच्या परीक्षक मंडळाने बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना विजेता घोषित करण्यात आले. भारतात तसेच अमेरिकेत कोविड १९ अर्थात कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रयत्न केलेल्या विविध व्यक्ती, संस्था यांना गौरवण्यासाठी या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. व्यक्ती, नवउद्योजक, कॉर्पोरेटस्, लघूउद्योग, बिगर शासकीय संस्था, प्रशासन अशा विविध संवर्गामध्ये भारत तसेच अमेरिका या दोन्ही देशातील मान्यवरांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
मुंबई महानगरपालिका आयुक्त चहल यांची “आयएसीसी कोव्हिड क्रुसेडर्स २०२०” पुरस्कारांमध्ये एक्झेम्प्लरी वर्क डन बाय ए ब्युरोक्रॅटस् - इंडिया या संवर्गामध्ये विजेता म्हणून निवड करण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्याच्या क्षणापासून चहल यांनी मुंबईतील कोरोना नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने कामाला सुरुवात केली. विषाणुचा पाठलाग अर्थात ‘चेस द व्हायरस’ हे धोरण आखून आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करण्यासह त्याचे योग्य व्यवस्थापनही केले. रुग्णालयांतील बेड्सची संख्या वाढवताना ठिकठिकाणी कोरोना आरोग्य केंद्र व अलगीकरण केंद्र देखील उभारले. टेस्टींग, ट्रेसिंग, ट्रॅकिंग, ट्रिटमेंट आणि क्वारंटाईन ही पंचसुत्री अवलंबून प्रत्यक्ष काम केले. वेगवेगळ्या वसाहतींमध्ये प्रतिबंधित क्षेत्र करुन कठोर उपाययोजना केल्या.
मुंबईतील सर्व आरोग्य यंत्रणा, डॉक्टर्स, सर्व विभाग कार्यालये, इतर संबंधित खाती तसेच लोकप्रतिनिधी, खासगी दवाखाने व नर्सिंग होम, स्वयंसेवी संस्था या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून मुंबईतील कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आणली. एवढेच नव्हे तर मृत्यू दर नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिनेही “सेव्ह द लाइव्हज” मिशन राबवून कोरोना बाधितांना आवश्यक ते सर्व उपचार मिळतील, यासाठी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले. मुंबईत झालेल्या एकंदर कामगिरीचे केंद्र सरकारसह जागतिक आरोग्य संघटनेनेही कौतुक केले. धारावीसारख्या झोपडपट्टीबहुल भागात अथक परिश्रम करुन कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी केलेले प्रयत्न तर इतर देशांनीही धारावी मॉडेल म्हणून स्वीकारले. या सगळ्या बाबी पाहता चहल यांची “आयएसीसी कोव्हिड क्रुसेडर्स २०२०” पुरस्कारांमध्ये एक्झेम्प्लरी वर्क डन बाय ए ब्युरोक्रॅटस् - इंडिया या संवर्गामध्ये विजेता म्हणून निवड करण्यात आली आहे.
पुरस्काराने सन्मान झाल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना आयुक्त चहल म्हणाले की, सदर पुरस्कार स्वीकारणे ही गौरवाची बाब आहे. कारण कोविड काळामध्ये करण्यात आलेली कामगिरी ही देशाची सेवा तर आहेच सोबत मानवतेची देखील सेवा आहे. या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल मी इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स तसेच परीक्षकांचा आभारी आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त म्हणून माझी नियुक्ती केली, त्याच क्षणीच निश्चय केला की सर्वोत्कृष्ट प्रयत्न करुन ही स्थिती नियंत्रणात आणेन. बृहन्मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा ही एकदिलाने राबली आहे. हे प्रयत्न करताना चाचण्या (टेस्टींग), रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स),
रुग्ण व्यवस्थापन (पेशंट मॅनेजमेंट), रुग्णालये व्यवस्थापन (हॉस्पिटल मॅनेजमेंट) या चार स्तंभाना बळकट करण्यावर भर दिला. कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईमध्ये कर्तव्य बजावताना “टीम बीएमसी” ने २०० पेक्षा अधिक सहकाऱयांना गमावले आहे तर ५ हजारापेक्षा अधिक सहकारी कोरोना बाधित झाले आहेत. पण आम्ही थांबलो नाहीत आणि त्यासाठी मी सर्वांना नमनही करतो. माझ्यासोबत नामांकन झालेल्या व्यक्तीदेखील पुरस्कारासाठी तितक्याच पात्र आहेत आणि ते समान अर्थाने विजेतेदेखील आहेत, अशी माझी भावना आहे. राज्य सरकार, सर्व लोकप्रतिनिधी, मुंबईकर नागरिक, वेगवेगळ्या संस्था, रुग्णालये, विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञ, माझे सर्व सहकारी अधिकारी, कर्मचारी असा सर्वांचा कोरोना स्थिती नियंत्रणात आणण्यात वाटा असून तेदेखील या पुरस्काराचे मानकरी आहेत. या सर्वांचा विशेषत: माझ्यावर विश्वास टाकणाऱया राज्य शासनाचा मी आभारी आहे, असेही चहल यांनी म्हटले आहे.