मुंबई - मुंबई महापालिकेला मालमत्ता करातून महसूल मिळतो. गेल्या वर्षाच्या सुरुवातीला कोरोनामुळे हा महसूल कमी झाला होता. मात्र, नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच ३१ मार्चपर्यंत बीएमसीने ५ हजार १३५.४३ कोटी रुपये इतका मालमत्ता कर वसूल केला आहे. महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात ही सर्वाधिक वसुली असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मागील वर्षी ४ हजार १६१ कोटी रुपये इतका महसूल पालिकेला प्राप्त झाला होता अशी माहिती सह आयुक्त सुनील धामणे यांनी दिली.
९८ टक्के कर वसूल -
मुंबई महापालिकेला जकात करामधून ७ हजार कोटी रुपये इतका महसूल मिळत होता. केंद्र सरकारने जीएसटी लागू केल्यावर जकात कर रद्द झाला. पालिकेने आपले उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी मालमत्ता कराची वसुली सुरू केली. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या आर्थिक वर्षात पालिकेने ५ हजार २०० कोटीं रुपये इतका मालमत्ता कर वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. या उद्दीष्टापेक्षा ९८ टक्के कर वसूल करण्यात आला आहे. महानगरपालिकेचे कामकाज शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तीन विभागाद्वारे चालते. पश्चिम उपनगरांमध्ये २ हजार ५४५.९४ कोटी, शहरी भागात १ हजार ५०९.५२ कोटी तर पूर्व उपनगरांमध्ये रुपये १ हजार ७६.९३ कोटी रुपये इतका मालमत्ता कर वसुल झाला आहे. याबाबत महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल आणि अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी कर निर्धारण आणि संकलन विभागाचे अभिनंदन केले आहे.
'या' विभागात सर्वाधिक कर वसुली -
या आर्थिक वर्षामध्ये सर्वाधिक मालमत्ता कर वसुली ही ‘के पूर्व’ म्हणजेच अंधेरी पूर्व विभागामध्ये ५४०.२८ कोटी रुपये इतकी झाली आहे. या खालोखाल ‘के पश्चिम’ म्हणजेच अंधेरी पश्चिम विभागामध्ये ४५४.५२ कोटी रुपये इतकी मालमत्ता कर वसुली झाली आहे. या दोन विभागांच्या नंतर वांद्रे (पूर्व) ‘एच पूर्व’ विभागामध्ये ४११.२५ कोटी रुपये इतकी कर वसुली झाली. यानंतर शहर भागातील वरळी ‘जी दक्षिण’ विभागामध्ये ३९९.२९ कोटी रुपये तर भांडुप ‘एस’ विभागात ३०३.६८ कोटी रुपये इतकी मालमत्ता कर वसुली झाली आहे.
करण्यात आलेली कारवाई -
वारंवार विनंती करून व नोटीस देवून देखील मालमत्ता कराचा भरणा महापालिकेकडे न करणा-यांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. जल जोडणी खंडित करणे, वाहने-वस्तू यासारखी जंगम मालमत्ता जप्त करणे, अशा कारवाया करण्यात आल्या आहेत. वर्षभरात तब्बल ११ हजार ६६१ मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. ‘एच पूर्व’ विभागात सर्वाधिक म्हणजे २ हजार ५३ मालमत्तांवर कारवाई करण्यात आली. तर आर्थिक वर्ष २०२०-२१ दरम्यान ४७९ मालमत्तांची जल जोडणी खंडित करण्यात आली. ‘टी’ विभागात सर्वाधिक म्हणजेच १४१ इतक्या मालमत्तांची जल जोडणी खंडित करण्यात आली होती. तर ५० ठिकाणी वाहने, संगणक, वातानुकूलन यंत्रणा इत्यादी वस्तू जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.
महानगरपालिकेच्या २४ विभागातील कर वसुली -
1. ए : 228.66 कोटी
2. बी : 36.89 कोटी
3. सी : 71.13 कोटी
4. डी : 212.16 कोटी
5. ई : 113 कोटी
6. एफ / दक्षिण : 132.18 कोटी
7. एफ / उत्तर : 121.92 कोटी
8. जी / दक्षिण : 399.29 कोटी
9. जी / उत्तर : 194.28 कोटी
10. एच / पूर्व : 411.25 कोटी
11. एच / पश्चिम : 267.40 कोटी
12. के / पूर्व : 540.28 कोटी
13. के / पश्चिम : 454.52 कोटी
14. पी / दक्षिण : 244.85 कोटी
15. पी / उत्तर : 199.17 कोटी
16. एल : 236.90 कोटी
17. एम / पूर्व : 87.69 कोटी
18. एम / पश्चिम : 131.74 कोटी
19. एन : 171.86 कोटी
20. एस : 303.68 कोटी
21. टी : 145.06 कोटी
22. आर / दक्षिण : 172.15 कोटी
23.आर /मध्य : 185.48 कोटी
24. आर /उत्तर : 70.86 कोटी
25. शासकीय मालमत्ता : 3.04 कोटी
एकूण - 5 हजार 135.44 कोटी