मुंंबई - फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेकडून पदपथांवर मार्किंग सुरू करण्यात आले आहे. लवकरच फेरीवाल्यांना महापालिकेकडून परवाने वाटप करण्यात येणार आहेत. मात्र, फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाला दादरमधील निवासी सोसायट्यांमधील रहिवाशांनी जोरदार विरोध केला असून याविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
पालिकेकडून फेरीवाला धोरणाअंतर्गत मुंबईतील पात्र फेरीवाल्यांचे त्याच परिसरात पुनर्वसन केले जाणार आहे. महापालिकेने दादर परिसरातील फेरीवाल्यांच्या केलेल्या सर्वेक्षणानुसार 16 हजार 80 फेरीवाले पात्र ठरले असून त्यातील 14 हजार 500 फेरीवाल्यांचे पुनर्वसन दादर परिसरातच केले जाणार आहे. यासाठी जी उत्तर विभाग कार्यालयाने दादर परिसरामधील पद्मबाई ठक्कर मार्गावरील पदपथांवरही जागा निश्चितीकरण सुरू केले आहे. पदपथांवर या जागांवर फेरीवाल्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. याला परिसरातील दुकानदार तसेच रहिवाशांनी जोरदार विरोध केला आहे. इतर जागेवरील फेरीवाल्यांना जर आमच्या परिसरात आणून बसवले तर या ठिकाणी कचरा तयार होईल असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
आमचा परिसर शांत आहे मात्र फेरीवाल्यांमुळे गर्दी वाढेल, कचरा वाढून रोगराई पसरेल अशी भीतीही येथील रहिवाशांनी व्यक्त केली. तर फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाबाबत इथल्या रहिवाशांनी अनेकदा विरोध दर्शवला आहे. पालिकेशी पत्रव्यवहार करून पालिकेच्या धोरणालादेखील विरोध केला आहे. मात्र पालिकेने त्याची कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही. यामुळे रहिवासी संतप्त झाले असून महापालिकेच्या विरोधात लवकरच आक्रमक मोर्चा काढण्याचा इशारा स्थानिक स्नेहल वर्तक यांनी दिला.
फेरीवाला धोरण राबवण्यासाठी महापालिकेने काही जागा निर्धारित केल्या आहेत. या जागांबाबतीत महापालिकेने नागरिकांच्या हरकती आणि सूचनाही मागितल्या होत्या. त्यांचा विचार करूनच फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेण्यात आला आहे. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात असून येत्या पंधरा दिवसांमध्ये फेरीवाल्यांना पालिकेकडून परवाना दिला जाणार आहे. पात्र फेरीवाल्यांच्या तुलनेत जर मार्किंग केलेल्या जागा कमी पडल्या तर लॉटरी पद्धतीने जागांचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.