मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयातील डॉक्टरांसह नर्स, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि इतर सर्व चतुर्थ श्रेणी वर्ग जीवाची पर्वा न करता कोविड योद्धा म्हणून गेली चार महिने काम करत आहेत. आता हेच कोविड योद्धा समाजिक भान राखत विविध उपक्रमाच्या माध्यमातूनही रुग्णसेवा करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचाच भाग म्हणून केईएमधील या कोविड योद्ध्यांनी, कर्मचाऱ्यांनी 6 ऑगस्टला रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात डॉक्टर-नर्स-कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांसह सर्वसामान्यांनी पुढे येत रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या साडेचार महिन्यांपासून रक्तदान शिबीरे कमी झाली असून वैयक्तिकरित्या रक्तदान करणाऱ्यांचीही संख्या कमी झाली आहे. परिणामी मुंबईत रक्ताचा तुटवडा आहे. अशावेळी थॅलिसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल अॅनिमियाबाधित रुग्णांना व इतर रक्ताशी निगडित आजारांच्या रुग्णांची मोठी अडचण होत आहे. ही बाब लक्षात घेत केईएममधील जयंती उत्सव कमिटी आणि अपना फाऊंडेशन, केईएम रुग्णालय रक्तपेढी विभाग यांनी पुढाकार घेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
केईएम रुग्णालयातील रक्तपेढीत सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेत रक्तदान शिबीर होणार आहे. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, इतर सर्व कर्मचारी रक्तदान करणार आहेत. त्यांचे नातेवाईक आणि इतर नागरिकही यावेळी रक्तदान करू शकतील, अशी माहिती आयोजकांपैकी प्रफुल्ल अहिरे यांनी दिली आहे. अधिकाधिक नागरिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेत सर्व नियम पाळत हे रक्तदान शिबिर पार पाडण्यात येणार असल्याचेही अहिरे यांनी सांगितले आहे.