मुंबई- सुशांतसिंह राजपूत प्रकरणात खोट्याचे खरे करण्याचा प्रयत्न सुरूच आहे. महाराष्ट्र सरकार व मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी 80 हजार फेक अकाऊंटस् समाज माध्यमांवर निर्माण केली. सायबर फौजांचा बेकायदेशीर वापर देशाला, समाजाला घातक ठरू शकतो हे गृहमंत्री अमित शहा यांनी मान्य केले पाहिजे. सुशांतसिंह राजपूत प्रकरण हे मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी कसे, वापरण्यात आले याचा स्पष्ट खुलासा आता झाला आहे. मुंबई पोलिसांनी हे सर्व समोर आणले. पोलिसांचे पाय आता कोणी खेचू नये, असे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' मधून 'रोखठोक' बजावले आहे.
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र राज्य, मुंबई पोलीस, मुख्यमंत्री ठाकरे, गृहमंत्री देशमुख व माझ्यावर एकेरी उल्लेख करून चिखलफेक करण्यासाठी पैशांचा वापर झाला. हे पैसे नक्की कुठून आले, त्यांचा बोलवता धनी आणि पैसे पुरवणारा धनी कोण हे स्पष्टपणे समोर आले पाहिजे, पण चोराच्या उलटय़ा बोंबा सुरू आहेत. त्या चोरांना महाराष्ट्राने आता सोडू नये.
80 हजार फेक अकाऊंटस
सोशल मीडियावर तब्बल 80 हजार किंवा त्यापेक्षा जास्त 'फेक अकाऊंटस्' उघडून पोलिसांची, महाराष्ट्र सरकारची, ठाकरे कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. यातील बहुतेक खाती तुर्कस्तान, जपान, इंडोनेशिया अशा देशांतून चालवली गेली हे समोर आले. हे सर्व कोणाच्या इशाऱयाने आणि मार्गदर्शनाखाली चालले होते त्याचा गौप्यस्फोट करण्याची गरज नसल्याचे संजय राऊत म्हणाले.
ज्यांनी समाज माध्यमांतून राहुल गांधींना 'पप्पू' ठरवले, मनमोहन सिंग यांना 'मौनी बाबा' ठरविले, त्याच लोकांनी सुशांतचे आत्महत्या प्रकरण एक पर्वणी मानले. सुशांतनिमित्ताने त्यांना पोलीस, सरकार व ठाकरे कुटुंबाची बदनामी करायची होती, असे संजय राऊत यांनी रोखठोक मधून स्पष्ट केले.
भाजपावर गंभीर आरोप
संजय राऊत यांनी रोखठोक मध्ये भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. सुशांतप्रकरणी महाराष्ट्राला बदनाम करण्याचे आंतरराष्ट्रीय कारस्थान होते व त्यात परदेशी पैसा वापरला गेला. मुंबईतील सिनेक्षेत्रात काम करणाऱ्या एका नटीने या कारस्थानाचे नेतृत्व केले व तिच्या दिमतीला भाजपने 'आयटी सेल' उभा केल्याचे राऊत म्हणाले.
80 हजार फेक अकाऊंटस् उघडून महाराष्ट्रविरोधी मोहीम पद्धतशीर राबविली गेली. आपल्या देशात 'आंतरराष्ट्रीय' स्तरावरचा राजकीय पक्ष कोणता व जगभरात आमच्या शाखा आहेत, असे अभिमानाने सांगणारा पक्ष कोणता हे नव्याने सांगण्याची गरज नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी भारपावर निशाणा साधला.
किमान पाच कोटी फेक अकाऊंटस् सोशल मीडियावर सक्रिय
सुशांतप्रकरणी एकट्या मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी 80 हजार फेक अकाऊंटस् निर्माण केली जातात. म्हणजे अशा प्रकारची किमान पाच कोटी फेक अकाऊंटस् सोशल मीडियावर सक्रिय आहेत. हे बेकायदेशीर काम कायद्यानेच थांबवायला हवे. देशाच्या गृहमंत्र्यांनी त्यात पुढाकार घ्यावा. सुरुवात स्वतःच्या पक्षापासून करावी लागेल,
''आम्ही कोणतीही बातमी आमच्या हजारो 'व्हॉटस्ऍप' ग्रुपच्या माध्यमांतून पटवून देऊ शकतो.'' असे शहा म्हणाले होते. हा आत्मविश्वास एका राजकीय पक्षाचे नेते म्हणून ठीक आहे, पण आज देशाची सूत्रे आपल्या हाती आहेत हे त्यांना विसरता येणार नाही. राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, सेनाप्रमुख, पोलीस यांना 'टार्गेट' करणे म्हणजे देशाच्या भवितव्याचा खड्डा खणण्यासारखे असल्याचे संजय राऊत म्हणाले.