मुंबई - राज्यातील कोरोना संकटावर नियंत्रण मिळवण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यश आलेले नाही. ते सपशेल अपयशी ठरले आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून त्यांनी स्वतःला 'मातोश्री'मध्ये कोंडून घेतले आहे. स्वत:ला क्वारंटाईन करून घेतले आहे, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. भाजप नेते किरीट सोमैय्या व विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यातील परिस्थिती गंभीर असताना आता तरी मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडावे, असे म्हणत खोचक टोला लगावला आहे.
राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ घरात राहणारे आणि जनतेत न मिसळणारे मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांचा नक्कीच उल्लेख करावा लागेल. राज्यावर कोविडसारखे महाभयंकर संकट आले तरी मातोश्री निवासस्थान सोडून मुख्यमंत्री कधीही बाहेर गेलेले नाहीत. आक्रोश झाल्यांनतर एखाद्या ठिकाणी बाहेर पडले असतील, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
हेही वाचा - पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन
एवढे महिने राज्य सांभाळूनही राज्यात तर सोडाच, मुख्यमंत्री मंत्रालयात सुद्धा यायला तयार नाहीत. मागे कोविड संदर्भात मंत्रालयात बैठक झाली, आम्ही सर्व नेते मंत्रालयात दाखल झालो. तर मुख्यमंत्री घरातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोलत होते, असा टोलाही दरेकर यांनी लगावला. पत्रकार रायकर यांचा आज मृत्यू झाला. मग काय झाले तुमच्या आरोग्य यंत्रणेचे? मुख्यमंत्री पुण्याला गेले, कोविड सेंटर सुरू केले, मोठं-मोठ्या घोषणा करून आलात. पण साधी एक रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही, बेड उपलब्ध झाला नाही. त्यामुळे आज त्या पत्रकाराला नाहक आपला जीव गमवावा लागला. राज्यात कधी नव्हे इतका विस्कळीतपणा या सरकारच्या काळात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एका बाजूला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असो, आपण स्वतः विविध प्रश्नांवर राज्यात वणवण फिरत आहोत, अगदी शरद पवारसुद्धा काही ठिकाणी जाऊन आले. मात्र, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडायला वेळ नाही आणि हे राज्याच्या हिताचे नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
भाजप नेते किरीट सोमैय्या म्हणाले की, पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू दुर्दैवी आहे, राज्यातील वैद्यकीय परिस्थिती गंभीर आहे, रुग्णांना बेड मिळत नाहीत. अवाजवी पैसे आकारण्यात येत आहेत. आता आरोग्य मंत्र्यांना घरी पाठवा आणि मुख्यमंत्री आणि बाकी मंत्र्यांना घराबाहेर काढा.