मुंबई : उत्तर भारतीय मतांसाठी ठाकरे शिंदे गटाचे जोरकस प्रयत्न सुरू आहेत. जो आपल्या सोबत येईल, तो आपला कारण प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. अशातच उत्तर भारतीय समाज, उत्तर भारतीयांची मते आपल्याकडे वळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीय समाजाचा मेळावा घेतला. त्यामध्ये त्यांनी त्यांना आपल्या सोबत राहण्याच आव्हान केले आहे.
ठाकरे यांच्यावर निशाणा साधला : दुसरीकडे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी उत्तर भारतीय मोर्चा व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ज्यांनी राम मंदिर आणि राम सेतूची खिल्ली उडवली त्यांना हिंदी भाषिक समाज ओळखून आहे. हा समाज हे जाणतो की, जो ना भगवान राम का, वो ना किसी काम का, असा टोला भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी लगावला आहे. तसेच है तय्यार हम, हे अभियान आम्ही हाती घेत असल्याचे सांगितले. भाजप पदाधिकाऱ्यांची व उत्तर भारतीय मोर्चाची मुंबईत बैठक झाली त्याप्रसंगी ते बोलत होते.
मिशन १५० चा संकल्प : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व धनुष्यबाण ही निशाणी शिंदे गटाला दिल्यानंतर एकीकडे शिंदे - फडणवीस सरकार मध्ये आनंदाचे वातावरण असले तरी दुसरीकडे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पूर्ण ताकतीनिशी मिशन १५० चा संकल्प करत भाजप मैदानात उतरली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पाहता मुंबईत राजकारण तापू लागलेले आहे. सर्व स्तरातील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी व महाविकास आघाडी कसोशीचे प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे भाजपनेही कंबर कसली आहे. कालच उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये उत्तर भारतीय सभेमध्ये उत्तर भारतीय ना त्यांच्यासोबत राहण्याचे आव्हान केले. लगेचच आज मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व उत्तर भारतीय मोर्चाची बैठक घेऊन मुंबई महानगरपालिकेसाठी रणनीती बनवली.
उद्धव ठाकरे मतांसाठी दारोदार फिरत आहेत: याबाबत माध्यमांशी बोलताना आमदा आशिष शेलार म्हणाले की, काल संपुर्ण मुंबईत भाजपतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ४१० ठिकाणी साजरी करण्यात आली. अन्य कुठलेही पक्ष या जयंती उत्सवात नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणारेही दिसले नाहीत. या सर्व बाबींसह आगामी काळातील पक्षाच्या कार्यक्रमांचा आढावा व नियोजन आजच्या बैठकीत आम्ही केले, असेही त्यांनी सांगितले. त्यांनतर आशिष शेलार म्हणाले की, ज्यांनी राम मंदिराची चेष्टा केली, राम सेतूची चेष्टा केली ते आज मतांसाठी दारोदार फिरत आहेत. त्यांच्या अहंकारामुळे ही अवस्था त्यांची झाली आहे. कधी उत्तर प्रदेशमध्ये यादवांना जाऊन भेटत आहेत तर कधी बिहारमध्ये जात आहेत, कधी तमिळनाडूमध्ये स्टॅलीन यांना जाऊन भेटत आहेत, तर मुंबईत रमेश दुबे यांना भेटत आहेत. आज मतांसाठी जोगवा मागण्याची, दारोदार फिरण्याची वेळ का आली. हिंदी भाषिक समाज भाजपा सोबतच आहे, आणि तो भाजपा सोबतच राहिल.
है तयार हम! : भाजपने शिंदे - फडणवीस सरकार राज्यात अस्तित्वात आल्यापासूनच मुंबई महानगरपालिकेवर कब्जा करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी मुंबईत विविध उपक्रम राबवायला सुरुवात केली. आशिष शेलार म्हणतात की, भाजपाने मुंबईत चौपाल सुरू केले तेव्हा पासूनच उध्दव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली. त्यामुळे आज ते उत्तर भारतीय समाजाच्या बैठका घेत आहेत पण आम्ही त्यांना सांगतो की, है तयार हम!, तसेच आम्हाला याची कल्पना आहे की, हिंदी भाषिक जाणतात, जो ना भगवान राम का वो ना किसी काम का!, असा टोला आमदार आशिष शेलार यांनी लगावला आहे.