मुंबई - देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी एकमताने निवड झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी विधानभवनात भाजपच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला होता. आज भाजपच्या विधीमंडळ गटनेत्याची निवड करण्यासाठी भाजपच्या आमदारांची मुंबईत बैठक आयोजीत केली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचेच नाव भाजपकडून पुन्हा मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित करण्यात आले आहे.
भाजपच्या विधीमंडळ गटनेत्याची निवड करण्यासाठी भाजप आमदारांची आज मुंबईत बैठक पार पडली. नेता निवडीसाठी केंद्रातील मंत्री नरेंद्र सिंग तोमर व राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना यांनी भाजपचे निरीक्षक म्हणून काम पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला होता.
गटनेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्यांचे आभार मानले. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन होणार असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने राज्य करु असे ते यावेळी म्हणाले. दुष्काळमुक्त महाराष्ट्र, संविधानाच्या अनुरुप राज्य चालवायचे असल्याचे सांगत गेल्या ५ वर्षांपेक्षा अधिक चांगले काम करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
3.09 PM : गटनेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दुष्काळमुक्त भारताचा निर्धार. सरकार स्थापन झाल्यानंतर तत्काळ शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पाण्याच्या नियोजनावर भर देणार असल्याचे ते म्हणाले.
2:52 PM : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह दहा आमदारांनी प्रस्तावाला दिले अनुमोदन. हरिभाऊ बागडे, सुरेश खाने, डॉ. संजय कुटे, राधाकृष्ण विखे पाटील, देवयानी फरांदे, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, शिवेंद्र राजे भोसले, आशिष शेलार यांचे अनुमोदन.
2.42 PM : आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधीमंडळ नेतेपदासाठी प्रस्ताव मांडला. सर्वाधिक जागा आणि मते मिळवलेला पक्ष भाजप असल्याचे व्यक्त केले मत.
2:37 PM : केंद्रीय कृषीमंत्री मंत्री नरेंद्र तोमर यांनी विधीमंडळ गटनेता निवडीची प्रक्रिया सुरु केली.
2.30 PM : विधीमंडळ इमारतीच्या 10 मजल्यावरील सभागृहात विधीमंडळ नेता निवडीचा कार्यक्रम सुरू.
1.00 PM : वाजता विधीमंडळामध्ये भाजपच्या आमदारांचे स्नेहभोजन.
12.33 PM : काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी भाजप कोणतीही चर्चा करत नसून शिवसेनेशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. महाजन म्हणाले, मतदारांचा कौल महायुतीला आहे. आज सत्तास्थापनेचा दावा केला जाणार नसून दोन- तीन दिवसात प्रश्न सुटेल अशी अपेक्षा आहे.
12.17 PM : नवनिर्वाचित भाजप आमदार मुंबई विधानमंडळाच्या कार्यालयात जमायला सुरुवात.
नेता निवडीसाठी केंद्रातील मंत्री नरेंद्र सिंग तोमर व राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना भाजपचे निरीक्षक म्हणून काम पाहाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे औपचारिकपणे फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे कुणाच्या हातात जाणार, हे काही वेळात समजणार आहे.