मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांविषयी केलेल्या वक्तव्यावरून भाजपने शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. शिव वडापाव, शिवथाळीच्या यशानंतर आता 'शिव दवाखाने' येणार आहेत, अशी बोचरी टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. संजय राऊत यांनी डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला अधिक कळते, असे वक्तव्य केले होते. यावरून संजय राऊत यांच्यावर टीका केली जात आहे.
कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत शिवसेनेवर टीका केली आहे. शिव वडापाव आणि थाळीच्या घवघवीत यशानंतर आता येत आहेत शिव दवाखाने, इथे डॉक्टरांच्या ऐवजी कंपाऊंडर असतील, अशी खोचक टीका अतुल भातखळकर यांनी ट्विटद्वारे केली आहे.
हेही वाचा - राज ठाकरेंनी पत्रातून मनसैनिकांना दिला धीर
शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांना काय कळते, असे विधान केले. या विधानानंतर आता राज्यभरातून राऊतांवर टीका होत आहे. डॉक्टरांच्या 'मार्ड' संघटनेनेही संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. यासाठी मार्ड संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. संजय राऊत यांनी केलेले विधान त्यांना मागे घेण्यास सांगा किंवा ‘आपली सुद्धा हीच अधिकृत भूमिका आहे, असे ग्राह्य धरावे का?’ असा प्रश्न मार्डने पत्रातून मुख्यमंत्र्यांना केला आहे.
संजय राऊतांनी केलेले वक्तव्य राज्यातील तरुण डॉक्टरांचे खच्चीकरण करणारे आहे. त्यामुळेच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर खोचक टीका केली आहे.
हेही वाचा - 'सुशांतसिंह प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यात कोणतेही राजकारण नाही'