मुंबई - 'रिपब्लिक टीव्ही' चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक केली आहे. यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजपतर्फे आंदोलन करण्यात येत असून वेगवेगळ्या माध्यमांवर निषेध व्यक्त होत आहे. त्यातच गोस्वामींना पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी सुनावल्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्यावर टीका करत राजीनामा देण्याची मागणी केली आहे.
अर्णब गोस्वामी अटक प्रकरणात महाराष्ट्र सरकारचे थोबाड फुटले. दंडाधिकारी न्यायालयाने पोलीस कोठडीची विनंती फेटाळत अर्णबना न्यायालयीन कोठडी दिली. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना थोडी जरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे भातखळकर यांनी ट्विट करून म्हटले आहे.
पोलीस कोठडी देता येणार नाही
न्यायदंडाधिकाऱ्यांची परवानगी न घेता सदर खटल्याचा पुनर्तपास सुरू केला गेला. आरोपीचा आत्महत्येशी दुवा सिद्ध होईल, असा पुरावा सादर करण्यात आलेला नाही.
सबब, पोलीस कोठडी देता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले. पण, हे सरकार मुद्दाम सूडबुद्धीने हे करत आहे, पण न्यायालयाने यांचे थोबाड फोडले आहे, असे भातखळकर यांनी मनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका केलेली आहे.