मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे नॉटरिचेबल आहेत. संजय राठोड वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे हजर होणार असल्याचे सांगितलं जात आहे. मात्र, ते कधी हजर होणार या संदर्भात निश्चित वेळ समजलेली नाही. परंतु शिवसेनेच्या नेते मंडळींकडून मात्र संजय राठोड यांची पाठराखण केली जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. यावरून संजय राठोड प्रकरणार पोलिसांवर दबाब असल्याचा आरोप करत अशा नेत्यांचा कडेलोट करायला हवा, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी संजय राठोड यांनी पाठराखण करताना पोलीस त्यांचे काम करत आहेत, त्यामुळे विरोधकांनी काही ठरवू नये, अशी प्रतिक्रिया दिली होती. तोच धागा पकडून आशिष शेलार यांनी शिवसेना नेत्यांवर प्रत्युत्तरादाखल टीकेची झोड उठवली आहे.
नेत्यांचा कडेलोट केला पाहिजे-
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात हे सरळ सरळ दिसून येत आहे की, पोलिसांवर दबाव आहे. म्हणूनच आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या लोकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही, त्या प्रकरणाशी संबंधित नेत्याची साधी चौकशीही होत नाही. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेवर यायचे आणि आपल्याच राज्यातील माता-भगिनींना न्याय द्यायचा नाही, अशा नेत्याला संजय राऊत पाठीशी घालत आहेत. मात्र खरेतर अशा नेत्यांचा कडेलोट केला पाहिजे, अशी जहरी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे ?
२३ वर्षांची पूजा चव्हाण काहीच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील परळीमधून पुण्यात आली होती. स्पोकन इंग्लिशचे क्लास करण्यासाठी ती पुण्याला जात असल्याचं तिने नातेवाईकांना सांगितले होते. पण पुण्याच्या वानवडी भागात मित्रांसोबत राहणाऱ्या पूजाला या काळात हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज भासली. त्यानंतर काही दिवस गेले आणि रविवारी मध्यरात्री पूजाने वानवडी भागातील या इमारतीवरून उडी मारून तिचं आयुष्य संपवले. त्यानंतर पूजाने हे टोकाचे पाऊल का उचलले याची उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. पूजा आणि तिच्या मित्राचे राज्य सरकार मधील एका मंत्र्यासोबतचे सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली त्याच्यानंतर आरोप आणि प्रत्याआरोपांची सुरुवात झाली.