मुंबई - सोमवारी मुंबईसह उपनगर, नवी मुंबई, ठाण्यातील अनेक भागात सकाळी 10 वाजता वीज प्रवाह अचानकपणे खंडित झाला. मात्र, काही तास उलटल्यानंतर अद्याप काही ठिकाणी वीज नसल्याचे सांगत भाजप नेत्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. बत्तीगुल सरकार गायब! जनतेने शॉक देण्याची वाट पाहताय की काय? असे म्हणत ट्वीट करत भाजप नेते आशिष शेलार यांनी सरकारवर टिका केली. तर मुख्यमंत्री म्हणजे पनवती असे म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनीही मुख्यमंत्र्यांना लक्ष केले.
तब्बल 13 तास उलटले तरी मुलुंड,भांडूप परिसरात सुमारे 70% हुन अधिक भाग तर ठाण्याचा 25% भाग अंधारातच असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. ऊर्जा मंत्री, सचिव, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणताच खुलासा नाही. रुग्ण आणि जनता हवालदिल. बत्तीगुल सरकार गायब! जनतेने शॉक देण्याची वाट पाहताय की काय? अशा आशयाचे त्यांनी ट्विट केले.
तर, "काय पायगुण आहेत या मुख्यमंत्र्याचे !! बसल्या पासुन.जे कधी नाही ते सगळ होत आहे. आता काय फक्त डायनोसर आणि एलीयन दिसायचे राहिले आहेत. ते ही दिसतील कदाचीत.पनवती" या शब्दात आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यावर टिका केली.
दरम्यान, मुंबई आणि उपनगरात काल अचानक वीजप्रवाह खंडीत झाल्याने तब्बल तीन ते चार तास वीज नव्हती. याचा अनेक क्षेत्रावर परिणाम झाला. त्यामुळे अनेक लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. वीज नसल्याने लोकल सेवा देखील विस्कळीत झाली होती. अनेक लोकल रेल्वे या रुळावरच अडकून पडल्या होत्या.आता मात्र हळूहळू हे पूर्वपदावर आले पण काही ठिकाणी मुंबईत अजूनही वीज नसल्याचे सांगत भाजप नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे. यावर आता शिवसेना नेते काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.