मुंबई - महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने महायुतीला सरकार स्थापन करण्यासाठी स्पष्ट जनादेश दिला आहे. त्यामुळे महायुतीचे सरकार स्थापन व्हावे, अशी जनतेची इच्छा आहे, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. तसेच सत्ता स्थापनेसाठी उशीर होत आहे. त्यामुळे याबाबत कोणकोणत्या कायदेशीर शक्यता आहेत. याची माहिती देण्यासाठी आम्ही राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या भेटीनंतर पुढे काय करायचे, याबाबत आता आम्ही निर्णय घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

24 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप-सेनेच्या महायुतीला स्पष्ट जनादेश मिळाला. मात्र, मुख्यमंत्रिपदावरून सेना-भाजप दोनही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अशा परिस्थितीत आज (गुरुवारी) भाजप नेते चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, आशिष शेलार आदी नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या जनतेने जनादेश महायुतीलाच दिला आहे. लवकरात लवकर महायुतीचे सरकार स्थापन व्हावे, अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. मात्र, सरकार स्थापनेला उशीर लागतो आहे. त्याच संदर्भात आम्ही राज्यपालांशी चर्चा केली, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
त्याआधी मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा येथे भेट घेतली होती. चंद्रकांत पाटील यांच्यासोबत गिरीश महाजन, आशिष शेलार आणि सुधीर मुनगंटीवार हे तिघेही उपस्थित होते.
LIVE
1:55 PM - गिरीष महाजनांचे राजभवन येथे आगमन
1:55 PM- सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, बबनराव लोणीकर हे देखील राजभवनात दाखल
1:57 PM -सर्व वरीष्ठ भाजप नेते राजभवनात दाखल
राज्यपाल आणि भाजप नेत्यांची बैठक सुरु